संतप्त सदस्याचा थेट आरोग्याधिकाऱ्यांना दंडवत! 

संतप्त सदस्याचा थेट आरोग्याधिकाऱ्यांना दंडवत! 

जळगाव - शहरात 22 वॉर्डांमध्ये स्वच्छतेच्या ठेक्‍यांपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या 15 वॉर्डांत अस्वच्छतेच्या तक्रारी अधिक आहेत. आरोग्य विभागाचे स्वच्छतेबाबतचे नियोजन कोलमडले असून, वारंवार तक्रारी करूनही आरोग्याधिकारी दखल घेत नाहीत. आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील त्यांच्या पदासाठी पात्र नाहीत, अशा तीव्र शब्दांत सदस्यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. तसेच यावेळी आरोग्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर सदस्य अनंत जोशी यांनी थेट डॉ. पाटील यांचे पाय धरून त्यांचा निषेध नोंदविल्याचा अजब प्रकारही सभेने अनुभवला. 

महापालिका स्थायी समितीची सभा आज सभापती डॉ. वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, अनिल वानखेडे होते. 

कर्मचाऱ्यांना दंड का नाही? 
सभेत अस्वच्छतेच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. यात भारतीय जनता पक्षाचे पृथ्वीराज सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनंत जोशी, खानदेश विकास आघाडीचे नितीन बरडे, ज्योती इंगळे यांनी सभागृहात शहरातील अस्वच्छतेसह सफाई होत नसल्याच्या तक्रारी सभागृहात मांडल्या. यात 22 वॉर्डांत ठेकेदारांवर स्वच्छता न केल्यास दंड आकारता; मग महापालिकेचे कर्मचारी सफाई करीत नाहीत. त्यांना दंड का लावला जात नाही? महापालिका दर महिन्याला स्वच्छतेवर कोट्यवधी खर्च करते. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी केवळ फुकटाचा पगार घेतात. शहरातील "जळगाव फर्स्ट'सारख्या संस्था महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेचे धिंडवडे काढत असून, याबाबत आरोग्याधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा तीव्र शब्दांत सदस्यांनी आरोग्याधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. सभापती सौ. खडके यांनी आरोग्याधिकाऱ्यांना कामात सुधारणा करा, ही तुम्हाला शेवटची संधी दिली जात आहे, असा स्पष्ट इशारा दिला. 

वाहने, कर्मचारी असूनही बोंबाबोंब 
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सुमारे साडेचारशे कर्मचारी, 35 घंटागाड्या, ट्रॅक्‍टर, डंपर आदी वाहने असूनही स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉर्डांपेक्षा अधिक तक्रारी येत आहेत. घंटागाड्या कचरा संकलनासाठी जात नसून, त्यात अनेक गाड्या बंद आहेत. याबाबत आरोग्याधिकारी अजिबात लक्ष देत नसून, प्रत्येक वेळी "गोलमाल' उत्तर देऊन "वेळकाढूपणा' करतात. सभागृहाचा वेळ तसेच महापालिका स्वच्छतेच्या यंत्रणेवर केला जाणारा पैसा वाया घालत आहे. त्यामुळे दुसरा आरोग्याधिकारी शोधा, असे आयुक्तांना सांगण्यात आले. 

ठेकेदारांना नाहक त्रास 
आरोग्याधिकारी 22 वॉर्डांत दैनंदिन स्वच्छतेसाठी दिलेल्या ठेकेदारांना नाहक त्रास देत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांपेक्षा चांगलीच साफसफाई करीत आहेत. सागर पार्क, शासकीय निवासस्थान, आमदार निवासस्थानावर ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना सफाईसाठी पाठविले जाते आणि वॉर्डात कचरा दिसला, की लगेच दंड आकारण्यात येतो. सागर पार्कच्या स्वच्छतेचे पैसे महापालिका आकारते. काम मात्र ठेकेदारांना करावे लागत असल्याचा आरोप यावेळी श्री. जोशी यांनी केला. 

जमत नसेल तर पद सोडा - आयुक्त 
आरोग्याधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपासंदर्भात आयुक्त सोनवणे यांनीही डॉ. विकास पाटलांना जाब विचारला. "प्रत्येक वेळी केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही. अनेक तक्रारी येतात. त्यापैकी किती दूर होतात, हा प्रश्‍न आहे. वाहन बंद पडले तर पर्यायी वाहन उपलब्ध होत नाही, तक्रारींचा निपटारा होत नाही. विचारणा केली तर नेहमी कारणे सांगितली जातात. हा प्रकार चालणार नाही, असे असेल तर पद सोडा,' या शब्दांत आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांना खडसावले. 

पाया पडायला लावू नका - जोशी 
"मनसे'चे सदस्य अनंत जोशी यांनी काय करायचे ते करा; पण शहरात स्वच्छता करा. मी एखाद्या दिवशी तुमची व्हिडिओ क्‍लीप दाखवून देईल. तुमच्या पाया पडायला लावू नका, या शब्दांत त्यांच्यावर तोंडसुख घेतले. आयुक्तांनी खडसावल्यानंतर डॉ. विकास पाटलांनी यापुढे कामात सुधारणा करू, असे सांगतानाच त्यासाठी अनंत जोशी यांची मदत घेतो, असे सांगताच श्री. जोशी यांनी भरसभागृहात डॉ. पाटील यांच्याजवळ जाऊन त्यांना दंडवत घातला. 

पाण्याला अजूनही दुर्गंधी 
पिवळसर पाणी जरी गेले असले, तरी दुर्गंधी मात्र पाण्याला आहे, असा प्रश्‍न श्री. जोशी यांनी उपस्थित केला. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पथकाने पाहणी केली असून, त्यांनी नाशिक येथील तज्ज्ञ करडिया यांना पाण्याचे नमुने व त्यावर काय उपाय करता येतील, याबाबत मार्गदर्शन मागितले आहे, अशी माहिती दिली. 

दरवर्षी जलकुंभांची स्वच्छता करा 
गेल्या पाच वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नाही. जलशुद्धीकरण केंद्राचे "सॅन बेल्ट' का बदलले जात नाहीत? त्यामुळे जलकुंभांत मोठा गाळ साचला आहे. परिणामी पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्त सोनवणे यांनी दरवर्षी जलकुंभांची स्वच्छता करा, तसेच आठ दिवसांत सर्व जलकुंभांच्या पाहणीसह स्वच्छतेचे वेळापत्रक तयार करून काम करा, अशा सूचना अभियंता खडके यांना दिल्या. 

जाहिराती काढून डॉक्‍टर येत नाहीत 
सभेच्या अजेंड्यावर महापालिका रुग्णालयांत औषधी, विविध साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर भाजपचे पृथ्वीराज सोनवणे यांनी महापालिका रुग्णालयांत रुग्णांची संख्या कमी होण्यामागे कारण काय, रुग्णालयांत सोयी-सुविधा नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी दवाखाना विभागाचे डॉ. राम रावलानी यांनी डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. मानधनावर डॉक्‍टरांचे पद भरण्याची जाहिरात काढूनदेखील एकही अर्ज आलेला नाही, असे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com