आदेशाची प्रत आल्यानंतर ‘मनपा’ ठरविणार भूमिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

जळगाव - अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठीची मंजूर निविदा रद्द करून महापालिकेने पुढील निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठातर्फे शुक्रवारी (६ ऑक्‍टोबर) देण्यात आले. महापालिकेला न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले नसून, आदेशाचे पत्र मिळाल्यानंतर भूमिका ठरविली जाणार असल्याची माहिती मिळाली.

केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत २९० कोटींची पाणीपुरवठा योजना महापालिकेसाठी मंजूर झाली होती. यात तांत्रिक सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत सर्वांत कमी दराची आलेली संतोष इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड व विजय क्रन्सट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविदा मंजूर केली होती. यावर निविदाधारक जैन इरिगेशन कंपनीने मंजूर निविदाधारकांच्या पात्रतेवर हरकत घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात मंजूर निविदा रद्द करून पुढील प्रक्रियेवर महापालिकेने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासन न्यायालयाच्या आदेशाची वाट बघत असून, त्यात कोणत्या मुद्यावरून निविदा रद्द केली, याचा अभ्यास करून नव्याने पुढील निविदाप्रक्रिया राबविण्याची भूमिका ठरविली जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली.