आदिवासी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

आदिवासी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

जळगाव - शिरसोली परिसरात मेहरुणच्या अठरावर्षीय तरुणाच्या मृत्यूच्या घटनेला पंधरा दिवस उलटत नाहीत, तोवर आज शिरसोलीत आदिवासी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांसह ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. 

शिरसोली येथील नेव्हऱ्या मारुतीजवळील खडी मशिनवर कार्यरत पावरा कुटुंबातील महिलेचा मृतदेह जवळच असलेल्या नाल्यात आढळून आला. औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. तथापि, या महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलिसांचा कयास असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.  

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली रोडवरील बापू झोपे यांचे नेव्हऱ्या मारुती मंदिराजवळ स्टोन क्रशर मशिन आहे. येथे गेल्या पंधरा वर्षांपासून राजू मानसिंग बारेला (वय ३५) हा पत्नी ममता व कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहे. खडी मशिनवर दिवसभर काम आणि रात्री राखणदारी करून हे दांपत्य गुजराण करीत होते. मृत महिलेला किरण, सुनील, शिवा आणि नागेश अशी चार मुले असून दोन्ही मोठी मुले जामनेर येथे नातेवाइकांकडे असतात. सोमवारी (ता. ३) नेहमीप्रमाणे काम आटोपल्यावर रात्री राजू बारेलाचे मित्र विनोद भिल, भगवान भिल हे दोघेही त्याच्या घरी आले. तिघांनी मनसोक्त मद्य प्राशन केल्यानंतर राजू नशेत असताना विनोद व भगवान हे ममताला ट्रिपलसीट दुचाकीवर घेऊन गेले होते. रात्रभर पत्नी घरी आली नाही, म्हणून राजू सकाळीच तिचा शोध घेत असताना पत्नी ममताचा मृतदेह जवळच नेव्हऱ्या नाल्यात आढळून आला. पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पोलिसांना घटना कळविल्यावर निरीक्षक सुनील कुराडे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा केल्यावर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.   

अनैतिक संबंधातून खून..? 
ममता बारेला या तीस वर्षीय महिलेस भगवान व विनोद रात्री सोबत घेऊन गेले होते. अनैतिक संबंधांसाठी तिच्यावर बळजबरी करून तिला मारझोड झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत ममता बारेलाचा पती राजू मानसिंग बारेला याच्यासह भगवान भिल, विनोद भिल या दोघांची निरीक्षक कुराडे यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, औद्योगिक वसाहत पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

शवविच्छेदन धुळ्यात
ममता बारेला हिच्या डाव्या डोळ्याजवळ आणि ओठाला मार लागला आहे. तिच्यावर अत्याचार झाला असण्याची शक्‍यता असून, मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी तज्ञांच्या टीमद्वारे शवविच्छेदन होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे डॉ. प्रवीण पाटील यांनी तिचा मृतदेह धुळे येथील शासकीय हिरे महाविद्यालयात रवाना करण्याचा निर्णय घेतला. उद्या (ता. ५) सकाळी ममताचा मृतदेह धुळ्याला रवाना होणार आहे. 

मृतदेह नेण्याची जबाबदारी कुणाची?
मृत ममता बारेला हिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. पत्नी मेली म्हणून पतीला किंवा मुलीचा मृत्यू झाला म्हणून तिच्या पित्यालाही फारसे काही देणेघेणे नसल्याप्रमाणे त्या दोघांची वर्तणूक होती. त्यांना हिंदी, मराठी भाषा कळत नसल्याने दुभाषक शोधून त्यांना समजावून सांगण्यात आले. मृतदेह धुळ्यापर्यंत नेण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे कुटुंबीयांवर असते. मात्र, बारेला कुटुंबाची परिस्थिती नसल्याने मृतदेह धुळ्यात कसा पाठवायचा, या विवंचनेत पोलिस सापडले आहेत.

मृत महिलेसह तिचा पती व इतर दोघांनी रात्री दारू घेतली. पती-पत्नीत भांडणही झाले. नंतर महिला रात्री दुचाकीवर दोघांसोबत बाहेर गेल्याची माहिती समोर आली. त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. मृतदेह नाल्यातील पाण्यात आठ ते दहा तास पडलेला होता. शरीरावर असलेल्या खुणा या खाली पडल्यामुळेच झाल्या, की मारहाण झाली हे अद्याप कळायचे आहे. तिच्यावर अत्याचार झाला किंवा तिला मारून पाण्यात फेकले, याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय नेमके मृत्यूचे कारण सांगता येणे कठीण आहे. 
- सुनील कुराडे, निरीक्षक, औद्योगिक वसाहत पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com