जळगाव जिल्ह्यात चाळीस वयोगटातील मतदारांचे प्रमाण सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

जळगाव - जिल्ह्यात १८, १९ व २० वर्षे या वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे सरासरी केवळ ०.५५ टक्केच आहे. तर ३० ते ३९ वयोगटातील २४ टक्के मतदार आहेत. तरुणांच्या अल्प प्रमाणामुळे शासनातर्फे १ ते ३१ जुलैदरम्यान नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी या मोहिमेव्यतिरिक्त इतर दोन दिवस शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कॅम्प घेतले जातील, अशी माहिती प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

मतदार नोंदणी अभियानासंदर्भात आज माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माहिती अधिकारी विलास बोडके, मिलिंद दुसाने यावेळी उपस्थित होते. 

श्री. मुंडके म्हणाले, की १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात पोस्टाद्वारे नमुना-६ पाठविणे, ऑनलाइन पद्धतीने व नागरी सेवा केंद्रात हे अर्ज स्वीकारले जातील. मतदान केंद्र अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन नमुना-६ गोळा करून तरुणांकडून ते भरून घेतले जातील. या मोहिमेअंतर्गत ८ व २२ जुलैस विशेष मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेत सहभागी होऊन नवमतदार तरुणांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यात ३२ लाखांवर मतदार
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात एकूण ३२ लाख २० हजार ७०३ मतदार असून त्यात १६ लाख ९७ हजार ९७० पुरुष तर १५ लाख २२ हजार ६६२ स्त्री मतदार आहेत. सर्वाधिक ३ लाख ४४ हजार २११ मतदार जळगाव शहर मतदारसंघात तर सर्वांत कमी २ लाख ६३ हजार मतदार एरंडोल मतदारसंघात आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघात मतदारयादीत मतदारांचे फोटो व मतदारांना ओळखपत्र देण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

तरुणांचे प्रमाण अत्यल्प
मतदारांमध्ये १८ ते २० या वयोगटातील मतदारांचे प्रमाण अल्प आहे. १८ वर्षे वयोगटाचे ०.०८ टक्के, १९ वर्षे गटातील ०.४४ तर २० वर्षे वयोगटातील ०.७३ मतदार आहेत. २१ ते २९ वर्षे वयोगटात १९.४९ तर सर्वाधिक २४.१४ टक्के मतदार ३० ते ३९ या गटातील आहेत.