चाळीसगाव: तेरा ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडीत

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

ज्या ग्रामपंचायतींची वीजबिले थकली आहेत, अशांचा पुरवठा खंडित केला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ग्रामपंचायतींना वीजबिल भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. बिलांचा त्वरित भरणा करुन वीजपुरवठा सुरळीत करुन घ्यावा.
- पुरुषोत्तम बोरनार, सहाय्यक अभियंता, वीज उपकेंद्र, पिलखोड.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : येथील वीज उपकेंद्रातर्गत वीजजोडणी असलेल्या सोळापैकी तेरा ग्रामपंचायतींचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. केवळ ग्रामपंचायतींच्या हलगर्जीमुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, थकीत वीजबिले पाण्यासाठी हेळसांड होत आहे. दरम्यान थकीत वीजबिले भरुन ग्रामपंचायतींनी पुरवठा सुरळीत करावा, असे आवाहन वीज कंपने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'गिरणा' पट्ट्यातील ग्रामपंचायतींकडून वीजबिले भरण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव वीज कंपनीला येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होताना दिसत आहेत. येथील वीज उपकेंद्रांतर्गत 16 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वीज जोडणी दिलेली आहे. या ग्रामपंचायतींना वारंवार सूचित करुनही त्यांनी वीज बिल भरण्यासंदर्भात दखल घेतली नाही. परिणामी, मागील व चालूची बिले थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही केली.

तीन ग्रामपंचायतींचा प्रतिसाद...
वीज कंपनीने थकीत वीजबिलाच्या भरण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी नवीन आदेश काढला होता. त्यानुसार वीज कंपनीकडून ग्रामपंचायतींना थकीत बिले भरण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. असे असताना ग्रामपंचायतींनी टाळाटाळ करीत चालढकल केली. परिणामी सोळापैकी केवळ तीनच ग्रामपंचायतींनी आपल्याकडील थकबाकी भरली. त्यामुळे तेरा ग्रामपंचायतींना वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतींना एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंतचे चालू वीजबिल भरावे लागणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींची चालू वीजबिले जवळपास 50 हजारापर्यंत आहेत. त्यांनी चालू बिल भरल्यानंतरच त्यांचा वीज पुरवठा सुरळीत होईल, असे वीज कंपनीकडून सांगण्यात आले.

पाणी असूनही हाल...
पाणीपुरवठा यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ऐन पावसाळ्यात सर्वत्र पाऊस असताना ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींना थकीत बिले भरण्यासंदर्भात सांगूनही अद्याप त्यांनी बिले भरलेली नाहीत. विजेअभावी नळांना पाणी येणे बंद झाले आहे. अनेक गावांमध्ये ग्रामस्थ ग्रामपंचायतींचा कर नियमित भरतात. काही गावांचा अपवाद वगळता, बहुतांश ग्रामपंचायतींची कर वसुलीही चांगली आहे. मात्र, वीजबिल नियमितपणे भरण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायतींच्या चुकांची झळ ग्रामस्थांना सोसावी लागत आहे.

या गावांचा केला वीजपुरवठा खंडीत...
वीज कंपनीने पिलखोड व सायगाव(दुहेरी जोडणी), मांदुर्णे, सेवानगर, टाकळी प्र. दे., पिंप्री, तळोंदा, शिरसगाव व अंधारी. यातील गावांमध्ये बहुतांश मातब्बर पुढारी असतानाही या गावांमध्ये केवळ विजेअभावी पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. तर नांद्रे-काकळणे(एकत्र वीजजोडणी), तळेगाव व आमोदे या ग्रामपंचायतींनी वीजबिले भरल्याने त्यांचा पुरवठा सुरळीत आहे.

ज्या ग्रामपंचायतींची वीजबिले थकली आहेत, अशांचा पुरवठा खंडित केला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ग्रामपंचायतींना वीजबिल भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. बिलांचा त्वरित भरणा करुन वीजपुरवठा सुरळीत करुन घ्यावा.
- पुरुषोत्तम बोरनार, सहाय्यक अभियंता, वीज उपकेंद्र, पिलखोड.