चाळीसगावला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

आनन शिंपी
रविवार, 13 ऑगस्ट 2017

या बाजार समितीत आतापर्यंत कांदयांना 2 हजार ते 2 हजार 700 चा भाव मिळाला. आज सकाळी लिलाव प्रक्रिया सुरू केल्यानंतर 1 हजार 500 च्या भावाने लिलाव पुकारण्यात आला. आज सुमारे 250 ट्रॅक्टर कांदा विक्रीला आलेला होता. 10 ते 12 ट्रॅक्टरचा लिलाव कमी भावात होताच शेतकरी संतप्त झाले.

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडून रास्ता रोको करण्याचा प्रयन्त केला.

या बाजार समितीत आतापर्यंत कांदयांना 2 हजार ते 2 हजार 700 चा भाव मिळाला. आज सकाळी लिलाव प्रक्रिया सुरू केल्यानंतर 1 हजार 500 च्या भावाने लिलाव पुकारण्यात आला. आज सुमारे 250 ट्रॅक्टर कांदा विक्रीला आलेला होता. 10 ते 12 ट्रॅक्टरचा लिलाव कमी भावात होताच शेतकरी संतप्त झाले. व्यापारी कमी भावात खरेदी करीत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पडला व दोन हजाराच्या वर भाव मिळावा असे सांगत शेतकरी रस्त्यावर आले व सर्वांनी रास्ता रोको केला. हा प्रकार पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील व काही संचालक लगेचच आले, त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. जास्तीचा भाव काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जवळपास 12 ते 15 खरेदीदार असताना दोनच व्यापारी लिलावात बोली बोलतात म्हणून शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. शेतकऱ्यांचा संताप पाहून सभापती रवींद्र पाटील यांनी 1 हजार ते एकवीसशे पर्यंत कांदा खरेदी केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर लिलाव प्रकिया सुरू करण्यात आली.