मध्यरात्रीनंतर नोंदवली महिला अधिकाऱ्याची साक्ष!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पंचायत समितीच्या कामकाजात नीटनेटकेपणा व शिस्त आणण्यासाठी ही समिती कार्य करत असली, तरी इथे या उद्देशालाच तडा गेला आहे. रात्री साडेबारा ते पहाटे चारपर्यंत महिलांना कार्यालयात थांबवून ठेवणे आवश्‍यक आणि योग्यही नव्हते.
- योगेश सोपान पाटील, सदस्य, पंचायत समिती, रावेर.

- 'पंचायत राज'चा अजब कारभार
- महिला कर्मचारीही पहाटे चारपर्यंत तिष्ठल्या; ना कुणाला खेद, ना खंत!

रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीच्या पथकाने रावेर येथे महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना मध्यरात्री साडेबारापासून पहाटे चारपर्यंत थांबवून ठेवत माहिती आणि साक्षी नोंदवल्याचा अजब प्रकार घडला आहे. महिलांची प्रतिष्ठा आणि नीति-संकेतांबाबत सदैव आग्रही राहणाऱ्या पक्षाचे सरकार राज्यात सत्तेवर असताना दिवसभर तिष्ठत राहिलेल्या महिला कर्मचाऱ्यांना उत्तररात्रीपर्यंत थांबवून या समितीला कोणत्या प्रश्‍नांचे उत्तर मिळवायचे होते आणि त्यातून कारभाराला लगेचच अशी काय गती येणार होती, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

पंचायत राज समिती एखाद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आणि बिनबोभाट काम करुन परत गेली, असे फारसे घडत नाही. नुकत्याच धुळ्याच्या दौऱ्यावर आलेल्या समितीमधील सदस्याला लाच देण्याचा प्रकार उघडकीस आला अन्‌ पंचायत राजच्या "अर्थ-कारणा'च्या एकेक सुरस कथा बाहेर येऊ लागल्या. आता जळगावच्या दौऱ्यावर आलेली समिती तरी जिल्हा परिषदेच्या कारभाराची "पारदर्शक' पडताळणी करेल आणि आपला वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करुन ग्रामीण भागासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांना गती देईल, अशी अपेक्षा होती. पण, काहीतरी भलतेच घडल्याशिवाय समितीचा दौरा पूर्ण झाला, हे कदाचित ग्राह्यच धरले जात नसावे.

गुरूवारी (ता. 26) जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेल्या समितीच्या पथकांनी विविध पंचायत समित्यांच्या कामकाजाची माहिती घेत पाहणी केली. अनेक ठिकाणच्या गैरकारभाराचा पंचनामा केला आणि संबंधितांना जाब विचारत कारवाई प्रस्तावित केली. एकीकडे हे घडत असताना रावेर येथे आलेल्या पथकाने मात्र "कार्यक्षमते'चे आगळेवेगळे दर्शन घडवले. हे पथक पंचायत समितीत रात्री साडेबारानंतर दाखल झाले. तत्पूर्वी एकाच दिवसात पथकाने अमळनेर, चोपडा आणि यावल येथेही भेटी दिल्या होत्या. यावल येथील कामकाज आटोपून ते रात्री दहापर्यंत रावेरला येऊ शकले असते; पण मुक्ताईनगर येथे स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेल्याने पथकाला किमान अडीच- तीन तास उशीर झाला. इकडे समितीच्या प्रतीक्षेतील सर्व महिला- पुरुष अधिकारी आणि कर्मचारी न जेवता तसेच थांबून होते. रात्री अकराला त्यांना जेवणासाठी पाऊण तासाची सुटी देण्यात आली, तेव्हा शहरात एकही हॉटेल उघडे नव्हते.

महिलांना कार्यालयात कामकाजाच्या वेळेनंतर अधिक वेळ; विशेषतः सायंकाळी सहानंतर थांबवू नये, असे संकेत असताना आणि शासनही महिलांच्या अधिकार व सुरक्षेबाबत विशेष आग्रही असताना ही समिती येईपर्यंत गटविकास अधिकारी सोनिया नोकोडे यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांना थांबवण्यात आले. पण, साडेबाराला तिथे पोहोचलेल्या समितीच्या पथकातील एकाही सदस्याला महिलांना इतक्‍या उशिरापर्यंत थांबवण्यात आल्याचा ना खेद वाटला, ना खंत! कारण त्यानंतर पहाटे चारपर्यंत कामकाज सुरू राहिले आणि समितीच्या गाड्या जळगावकडे रवाना झाल्यावरच या महिला कर्मचाऱ्यांसह सर्वांची सुटका झाली.

रावेर येथे महिला गटविकास अधिकारी आहेत, त्याचबरोबर पंचायत समिती कार्यालयात व जिल्हा परिषदेशी संबंधित विभागांत अनेक महिला कर्मचारी आहेत, हे या समितीला माहिती नव्हते काय, असे प्रश्‍न विचारले जात आहेत. समिती येणार म्हणून या साऱ्याजणी सकाळी सातपासून कार्यालयात आल्या होत्या. त्याची साधी जाणीवही या समितीला नसावी, याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. येथे महिला अधिकारी-कर्मचारी आहेत म्हणून समितीने दौऱ्यात सकाळपासूनच बदल केला असता किंवा आधी रावेरमधील कामकाज पूर्ण केले असते आणि नंतर मुक्ताईनगर गाठले असते, तर महिलांची झालेली मोठी गैरसोय टाळता आली असती. शिवाय, धुळ्याच्या तुलनेत जळगाव जिल्हा मोठा असल्याने तीनऐवजी चार दिवसांचा दौरा केला असता, तर दिवसाउजेडी कामकाज पूर्ण करता आले असते. रात्री उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यांना थांबवून समितीने काय साध्य केले, असा सवालही निर्माण झाला आहे.