वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हत्येने पार्वतीनगरात खळबळ

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हत्येने पार्वतीनगरात खळबळ

जळगाव - जूनमध्येच जळगावी बदली झाल्यानंतर येथील पदभार स्वीकारण्यासाठी डॉ. अरविंद मोरेंनी काही दिवस घेतले. नुकतीच त्यांनी पार्वतीनगरात खोली भाड्याने घेतली व अवघ्या काही दिवसांत याच खोलीत त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने घरमालकासह पार्वतीनगरातील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, डॉ. मोरेंचा मृत्यू हत्या आहे की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असले, तरी शवविच्छेदन अहवालासह न्याय सहाय्यक व वैद्यक प्रयोगशाळेचा (फॉरेन्सिक रिपोर्ट) अहवाल आल्यानंतर त्याबाबत कळू शकेल, असे सांगण्यात आले.

अधीक्षकांसह अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, विभागीय पोलिस अधिकारी नीलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, रामानंदनगर पोलिस, तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी धाव घेतली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्‍वानपथक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मृतदेहाची व घटनास्थळाची तपासणी केली. महापौर ललित कोल्हे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनीही घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

पायाखाली आढळली करवत
पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर डॉ. मोरे यांचा मृतदेह दरवाजाच्या उंबरठ्यावर होता. तर त्यांच्या पायाखाली धारदार करवत आढळून आली. गळा चिरल्याच्या लांबलचक खुणा व गळ्याजवळ खोल भोसकले होते. प्राथमिकदृष्ट्या हा खूनच असल्याचे आढळून येत आहे, मात्र तरीही त्यांनी आत्महत्या केली असावी का? या शक्‍यतेनेही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या पथकाला पुरावे मिळाले नसल्यामुळे नाशिक येथील फॉरेन्सिक टीमला बोलविण्यात आल्यानंतर दुपारी नाशिक येथील टीमने घटनास्थळी येऊन पुन्हा पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न केले. 

‘हॅप्पी’ श्‍वानकडून तपासणी 
घटनास्थळी मारेकऱ्याच्या तपासासाठी पोलिस विभागाचा श्‍वान हॅप्पीला आणले. हॅप्पी घटनास्थळाच्या खोलीपर्यंत माग दाखवू शकला. त्यामुळे मारेकरी माग काढणे, आले कसे याबाबत अजून काही धागा पोलिसांना मिळून आला नाही.

परिसरात नागरिकांची गर्दी
पार्वतीनगरात डॉक्‍टरची हत्या झाल्याची वार्ता पसरताच या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.   जिल्हापेठ, रामानंदनगर, शनिपेठ तसेच शहर पोलिस ठाण्यात डीबी कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी हजेरी लावली होती. दुपारपर्यंत विभागीय पोलिस अधिकारी नीलोत्पल यांनी मृतदेहाची, तसेच रक्ताच्या थारोळ्यात भरलेल्या खोलीची पाहणी करीत पुराव्याचा शोध घेतला. परंतु, मृतदेहाच्या पायाजवळ पडलेल्या करवतीशिवाय त्यांना याठिकाणी काहीही मिळून आले नाही. अखेर दुपारी रुग्णवाहिका बोलावून डॉ. मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. 

रविवारी सायंकाळी झाला मृत्यू?
मृतदेहाच्या प्राथमिक तपासणीनंतर घटना उघडकीस येण्याच्या सुमारे १५ ते १७ तास आधी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. वाहनचालकाला हा प्रकार सोमवारी सकाळी नऊला आढळून आला, त्यापूर्वी १५ अथवा १७ तास गृहीत धरले तर डॉ. मोरेंचा मृत्यू रविवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

शनिवारी रेल्वेस्थानकावरून आले परत
डॉ. मोरे शनिवार व रविवार सुटी असल्याने शनिवारी दुपारी नाशिकला जाणार होते. कुष्ठरोग पंधरवड्यानिमित्त सोमवारी समिती येणार असल्याने शनिवारी रुग्णालयात कामकाजासाठी ते दुपारपर्यंत थांबले होते. दुपारी तीन वाजता गीतांजली एक्‍स्प्रेसने जाण्यासाठी निघाले, मात्र रेल्वेस्थानकावरून परत रुग्णालयात आले. समितीच्या दौऱ्यामुळे नियोजन करून सायंकाळच्या गाडीने जातो, असे कर्मचाऱ्यास सांगितले. सातपर्यंत रुग्णालयात थांबल्यानंतर कर्मचाऱ्यांना मी आता काही नाशिकला जात नाही, असे सांगितल्यानंतर वाहनचालक जाधव यांनी रात्री आठला डॉ. मोरे यांना त्यांच्या पार्वतीनगरातील रुमवर सोडले. 

कुटुंबीयांचा आक्रोश
डॉ. मोरे यांच्या मृत्यूची बातमी नाशिक येथील नातलगांना देण्यात आली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास डॉ. मोरे यांचे बंधू प्रकाश मोरे, शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, शालक व भाचा हे जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. त्यांनी डॉ. मोरे यांचा मृतदेह पाहिल्यानंतर एकच आक्रोश केला. तर डॉ. मोरे यांच्या पश्‍चात पत्नी नीलिमा, मुंबई येथे इंजिनिअर असलेले दोन मुले संदेश व समीरही सायंकाळपर्यंत जळगावी पोचले. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नाशिकला घेऊन जाणार असल्याचे नातलगांनी सांगितले. 

‘कॉल डिटेल्स’वरून मिळू शकतो धागा
डॉ. मोरे शनिवारी रात्रीपर्यंत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यानंतर मात्र रविवारपासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. आज सकाळी आरोग्य समिती आल्यानंतर डॉ. मोरे यांना घेण्यासाठी चालक घरी गेल्यावर देखील फोन डॉ. मोरे फोन उचलत नव्हते. रविवारपासून डॉ. मोरे यांना कोणते मोबाईल कॉल्स आले, त्यांनी कुणाला कॉल केले याची माहिती पोलिस मिळवीत असून, त्यानंतर काही बाबी समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नातेवाइकांनी केली विचारपूस
डॉ. मोरे यांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे घटनास्थळ बघण्याची मागणी केली. त्यानुसार पार्वतीनगरातील डॉ. मोरे राहत असलेल्या घरी नातेवाइकांना पोलिस घेऊन गेले व घटनास्थळ दाखविले. त्यांच्या नातेवाइकांनी घरमालक व शेजारी यांच्याकडून घटनेबाबत माहिती जाणून घेतली.

कंठ ते मणक्‍याच्या हाडापर्यंत वार
डॉ. मोरे यांच्या मानेवर खोलवर जखम झाली असून, वार अत्यंत खोलवर झालेला आहे. कंठ ते मणक्‍याच्या हाडापार्यंत धारदार शस्त्राद्वारे खोलवर वार झालेला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर हा प्रथमदर्शनी खूनच असल्याचा दावा करण्यात आल्याने रामानंदनगर ठाण्यात याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डॉ. मोरे रविवारी दोनवेळा घराबाहेर दिसले
डॉ. मोरे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बाहेरून नाश्‍ता पिशवीत घेऊन येताना शेजाऱ्यांना दिसले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीने डॉक्‍टरांना घराची खिडकी लावताना बघितले. त्यानंतर त्यांना परिसरात कुणीही बाहेर बघितले नाही, अथवा त्यांच्या खोलीकडे जातानाही कुणाला पाहण्यात आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com