शहरातील दोन पेट्रोलपंपांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जळगाव - राज्यभरात पेट्रोलपंप तपासणी मोहिमेअंतर्गत आज शहरातील पांडे डेअरी चौकातील इंडियन ऑइलच्या अमल ऑटो पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखा, भारत पेट्रोलियम व वजनमापे विभागाने कारवाई केली. साडेचार तास केलेल्या तपासणीतून पेट्रोल पंपामधील एका युनिटच्या मशिनमध्ये तफावत आढळली. त्या मशिनमधील कंट्रोल कार्ड, पल्सर चीप, की-बोर्ड तपासणीसाठी पाठविले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दिली. तसेच दुपारी शहरातील मोहाडी रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपाची देखील तपासणी करण्यात आली.

जळगाव - राज्यभरात पेट्रोलपंप तपासणी मोहिमेअंतर्गत आज शहरातील पांडे डेअरी चौकातील इंडियन ऑइलच्या अमल ऑटो पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखा, भारत पेट्रोलियम व वजनमापे विभागाने कारवाई केली. साडेचार तास केलेल्या तपासणीतून पेट्रोल पंपामधील एका युनिटच्या मशिनमध्ये तफावत आढळली. त्या मशिनमधील कंट्रोल कार्ड, पल्सर चीप, की-बोर्ड तपासणीसाठी पाठविले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दिली. तसेच दुपारी शहरातील मोहाडी रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपाची देखील तपासणी करण्यात आली. पेट्रोलचालकांबाबत ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपांवर भेसळयुक्त पेट्रोल व पेट्रोलमधील घटकांबाबत तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जाळे राज्यभर पसरले असून, राज्यातील पेट्रोलपंपाची तपासणी केली जात असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाण्याच्या पथकाने पेट्रोलपंपाची तपासणी केली. त्यात पाच लिटरमागे फक्त ३२ मिलिलिटर पेट्रोलची तफावत आढळून येत आहे. तपासणीदरम्यान पंप बंद ठेवण्यात आला होता. तपासणीनंतर पंप सुरू करण्यात आला, तो आताही सुरूच आहे. पथकाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. 
- लक्ष्मीकांत चौधरी, संचालक, अमल ऑटो

तिन्ही युनिटची तपासणी
अमल पेट्रोल पंपांवर ठाणे गुन्हे शाखेचे पथक व वजनमापे विभागाने सकाळी आठ वाजून ४० मिनिटांपासून कारवाईला सुरवात केली. अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंपातील तिन्ही युनिटची तपासणी केली. तिन्ही युनिटमधील पेट्रोलचे मापानुसार नमुने घेतले. पथकाने पंपाचे युनिट तपासण्यासाठी विशिष्ट यंत्रही सोबत आणले होते.

कंट्रोल कार्ड, पल्सर, की-बोर्ड तपासणी
पथकाने केलेल्या एका युनिटच्या तपासणीतून पेट्रोलच्या प्रमाणात तफावत आढळून आली. या युनिटचे पथकाने कंट्रोल कार्ड, पल्सर, की-बोर्ड ताब्यात घेतले असून, ते तपासणीसाठी मुंबई किंवा कोइंबतूर येथे पाठविले जाणार आहेत. पेट्रोल-डिझेलचा एकूण साठा व वितरणाचा तपशीलही तपासण्यात आला.  

पाच लिटरमागे ४० मिलिलिटर पेट्रोल कमी
पांडे डेअरी चौकातील पेट्रोलपंपावरील तपासणीअंती एका युनिटमधील मशिनमधून ५ लिटर, ३ लिटर, २ लिटर, १ लिटरचे नमुने घेतले. यावेळी ५ लिटरमागे ४० मिलिलिटर पेट्रोल कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या पेट्रोलपंपावरील एक युनिट बंद केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

अहवालावरून कारवाई होणार 
पेट्रोलपंपावर केलेल्या तपासणीच्या कारवाईचा अहवाल तयार केला जाणार आहे. कारवाईच्या नियमानुसार २५ ते ३० मिलिलिटर पेट्रोल कमी आढळल्यास कारवाईचे अधिकार वजनमापे विभागाला असतो, तर ३५ ते ४० मिलिलिटर पेट्रोल कमी आढळल्यास कारवाईचे अधिकार हे भारत पेट्रोलियम कंपनीला असून, कंपनी कारणे दाखवा नोटीस देऊन दंडाची कारवाई पेट्रोल पंपचालकांविरुद्ध करू शकते. या तपासणी कारवाईचा अहवाल तयार करून पेट्रोलपंपचालकाला चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. 

मोहाडी रस्त्यावरील पंपाची देखील तपासणी
पांडे डेअरी चौकातील पेट्रोलपंपाची ठाणे क्राइम ब्रॅंचच्या पथकाने तपासणी केल्यानंतर मोहाडी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर मोर्चा वळविला. पथकाने दुपारी एकच्या सुमारास मोहाडी रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या पंपाची तपासणी करून तेथील युनिटची तपासणी करून नमुने घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.