उमर्टीच्या गावठी पिस्तुलांचा ‘बार’!

उमर्टीच्या गावठी पिस्तुलांचा ‘बार’!

जळगाव - महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेवरील उमर्टी हे संपूर्ण गाव गावठी हत्यारे बनवून विक्रीच्या व्यवसायात आहे. पाच हजारांपासून ३५ हजारांपर्यंत घरपोच गावठी हत्यार पोहोचविणारे एजंट या ठिकाणी कार्यरत आहेत. लगतच्या औरंगाबाद, बुलडाणा या जिल्ह्यांसह गुजरात ते दिल्लीपर्यंतच्या गुन्हेगारी जगताला पिस्तूल पुरविण्यासाठी हे केंद्र खुणावतेय आणि जळगाव जिल्हा या वाहतुकीचा खरा वाहक ठरतोय...

गावठी कट्ट्यास जिल्ह्यात सर्वाधिक मागणी
बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात (आर्मॲक्‍ट) अटक केलेल्या संशयितांकडून घेतलेल्या माहितीनुसार, मागणी वाढल्याने व गुप्त पद्धतीने कट्टा आणून देणारे अनेक दलाल कार्यरत झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मागणी भुसावळपाठोपाठ अमळनेर आणि नंतर जळगाव व चाळीसगावातील गुन्हेगारांचा क्रमांक लागतो, अशी माहिती गावठी कट्ट्यासह पोलिसांनी पकडलेल्या संशयिताशी केलेल्या चर्चेतून उपलब्ध झाली आहे.

भुसावळला प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीजवळ गावठी कट्टा
भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी आणि राजकीय अस्थिरता पाहता, प्रत्येक तिसरा व्यक्ती गावठी कट्टा घेऊनच घराबाहेर पडतो, अशी स्थिती आहे. यापाठोपाठ जळगाव शहरातही अवैध बंदुका बाळगण्याचे फॅशन गुन्हेगारांमध्ये रूढ होत चालले आहे. मध्य प्रदेशाचा सीमावर्ती भाग मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपड्यापर्यंतच्या परिसरात सातपुडा पर्वतराजीतून पाच हजारांपासून ३५ हजारांपर्यंत हॅण्डमेड रिव्हॉल्व्हर सहज उपलब्ध होते. पावरा, भिल्ल समुदायातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण या व्यवसायात मोठ्या प्रमाणात ओढले गेले आहेत. कंबरेला खोचून, कधी वाहनाच्या डिक्कीत, तर कधी लाकडांच्या मोळ्यांमधून गावठी कट्टे पर्वतावरून खाली उतरविले जातात. चोपडा तालुक्‍याला लागून असलेल्या पर्वतीय भागात सहजपणे हक्काचा रोजगार म्हणून आदिवासी पावरा, भिल्ल तरुण एजंट म्हणून कार्यरत आहेत.

बंदूक वागवणे झाली ‘फॅशन’
एरवी पोलिस अधिकाऱ्यांच्या कंबरेला दिसणारी रिव्हॉल्व्हर, लोकप्रतिनिधींसह मंत्र्यांच्या कंबरेला चिकटल्याचे छायाचित्र वृत्तपत्रांत येऊ लागले. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे आपल्याकडेही पिस्तूल हवी. किरकोळ शत्रुत्वाच्या कारणांवरून एकमेकांचा जीव घेण्याइतपत मजल गाठली जात असल्याने प्रत्येकालाच बंदुकीचा नाद लागला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिन्यापूर्वी पकडलेल्या मनोरुग्ण साधूच्या वेशातील व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर मिळून आले होते. 

जिल्ह्याला सूडाची लागण
भुसावळ शहरात सूडातून गोळीबाराच्या घटना दिवसा घडल्या आहेत. सानिया कादरी गोळीबार प्रकरणानंतर भुसावळ शहरात बंदूकपर्वाला सुरवात झाली. नगराध्यक्ष पुतण्याच्या डोक्‍यात गोळ्या झाडल्याच्या घटनेनंतर वर्ष- दोन वर्षे शांत राहिल्यानंतर पुन्हा मोहन पहिलवानच्या खुनानंतर गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. एक न्यायालय आवारात, तर दुसरी धावत्या बसमध्ये. संपूर्ण जिल्ह्यात गोळीबाराचे लोण पसरून जळगाव शहरात डॉ. आंबेडकरनगर भागात दोघांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार झाला, तर अमळनेर शहरात एकाला जीव गमवावा लागला. नुकताच भारतनगर भागात गोळीबार झाल्याप्रकरणी पोलिसपुत्रासह पाच ते सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सातपुडा पर्वतातील उमर्टी येथे गावठी कट्टे विक्रीसाठी आणणाऱ्या चाळीसपेक्षा अधिक पावरा- भिल्ल संशयितांना अटक झाली आहे. उपाययोजना म्हणून जिल्हा पोलिस व मध्य प्रदेश पोलिस दलाच्या संयुक्त ‘बॉर्डर कॉन्फरन्स’मध्ये एकत्रितरीत्या कारवाईचा निर्णय झाला आहे आणि व्यक्तिश: गुन्हे शाखा निरीक्षक म्हणून मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. माहिती मिळताच कारवाई होते. सिकलगर संशयितांकडून पावरा तरुणांना आमिष देत कट्ट्यांची वाहतूक केली जाते. साध्या वेशातील पोलिसही ते सहज ओळखतात. पोलिस दिसताच ते शस्त्र झाडाझुडपात टाकून पोबारा करतात. कट्टे आणणाऱ्या एजंट तरुणांसाठी खास खबऱ्यांना पेरून झालेल्या कारवाईमुळे इतके गुन्हे व शस्त्र जप्त झाले आहेत.
- राजेशसिंह चंदेल, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com