‘टेकऑफ’साठी २३ डिसेंबरचा मुहूर्त

‘टेकऑफ’साठी २३ डिसेंबरचा मुहूर्त

जळगाव - विमानसेवा सुरू होण्याचे जळगावकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आता येत्या २३ डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. या दिवशी येथील विमानतळावरून मुंबईकडे पहिले ‘टेकऑफ’ होणार असल्याची माहिती महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे विमानसेवेने जोडण्यासाठी ‘उडान’ (उडे देशका आम नागरिक) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील दहा शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यात पहिल्या टप्प्यात जळगावचा समावेश करण्यात आला आहे. एअर डेक्कन विमान कंपनीने यासंबंधात पुढाकार घेतला आहे. जळगाव येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. 

जळगाव येथून पहिले विमान मुंबईच्या दिशेने येत्या २३ डिसेंबरला झेपावणार असून जळगावकरांचे कित्येक वर्षांपासूनचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही विमानसेवा आठवड्यात सोमवार वगळता दररोज सुरू राहणार आहे. या विमानसेवेमुळे जळगावकरांसाठी मुंबईचा प्रवास आता अधिक सुखकर होणार असून, अवघ्या दीड तासात मुंबई गाठता येणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे.

१९ प्रवासी क्षमता 
एअर डेक्कन कंपनीचे हे विमान ‘बी १९०० डी’ प्रकारचे एअरक्राफ्ट असून, याची प्रवासी क्षमता १९ इतकी असणार आहे. जळगाव-मुंबई या विमानसेवेची जिल्हा प्रशासनातर्फे व विमान प्राधिकरणातर्फे पूर्वतयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिली आहे. यासाठीचे ऑनलाइन बुकिंग एअर डेक्कन कंपनीच्या वेबसाइटवर सुरू झाले आहे. एक रुपये भरून बुकिंग करता येईल. त्यातून लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना सवलतीच्या दरात जळगाव ते मुंबई प्रवास करता येणार आहे.
 

आठवड्याचे वेळापत्रक...
मुंबईहून सकाळी ७.४० मिनिटांनी उड्डाण, जळगावला ९.१० ला पोहोचेल.
मंगळवार, बुधवार व रविवारी जळगाव येथून सकाळी ११.१५ वाजेला उड्डाण, मुंबई येथे दुपारी १२.४५ वाजेला पोहोचेल.
गुरुवार, शुक्रवार व शनिवारी जळगाव येथून दुपारी ३.१० ला उड्डाण, मुंबई येथे दुपारी ४.४० ला पोहोचेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com