उत्सवकाळात पोलिसांचे मनोबल वाढविणारा उपक्रम:दत्तात्रय कराळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

प्रतीकात्मक, पण.. प्रेरणादायी 
पोलिस अधीक्षक कराळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत "सकाळ'चा हा उपक्रम प्रतीकात्मक असला तरी तो पोलिसांचे मनोबल वाढविणारा, प्रेरणादायी आहे. उत्सवकाळात पोलिस रात्रीचा दिवस करुन मेहनत घेतात, सतत तणावाचे वातावरण असते. बंदोबस्तादरम्यानही प्रचंड कामाचा ताण असतो. या स्थितीत समाज आपल्यासोबत आहे, याची ग्वाही देणाऱ्या या उपक्रमाने निश्‍चितच पोलिसांचे बळ वाढते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

जळगाव : उत्सवकाळात पोलिसांवर येणारा कामाचा ताण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून "सकाळ'तर्फे राबविला जाणारा "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम स्तुत्य व पोलिसांचे मनोबल वाढविणारा आहे, या शब्दांत पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

दरवर्षाप्रमाणे यंदाही "सकाळ' माध्यम समूहातर्फे गणेशोत्सव काळात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रमांतर्गत चिक्कीवाटप करण्यात आले. आज (ता.1) सायंकाळी शिवतीर्थ मैदानावर झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात श्री. कराळे बोलत होते. यावेळी अप्पर अधीक्षक बच्चन सिंह, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारलेल्या नवजीवन सुपरशॉपचे संचालक आकाश कांकरिया, "सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा आदी उपस्थित होते. 

शुक्रवारी सायंकाळी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन शिवतीर्थाहून निघाले, तत्पूर्वी हा कार्यक्रम झाला. प्रारंभी निवासी संपादक विजय बुवा यांनी या उपक्रमाविषयी भूमिका मांडली. पोलिसांना दिली जाणारी ही चिक्की पोट भरेल, एवढी नसली तरी "सकाळ'च्या सामाजिक बांधिलकीचे ते प्रतीक आहे. बंदोबस्तादरम्यान येणाऱ्या तणाव, थकव्याच्या काळात समाज आपल्यासोबत आहे, हे दर्शविणारा हा उपक्रम असल्याचे ते म्हणाले. 

प्रतीकात्मक, पण.. प्रेरणादायी 
पोलिस अधीक्षक कराळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत "सकाळ'चा हा उपक्रम प्रतीकात्मक असला तरी तो पोलिसांचे मनोबल वाढविणारा, प्रेरणादायी आहे. उत्सवकाळात पोलिस रात्रीचा दिवस करुन मेहनत घेतात, सतत तणावाचे वातावरण असते. बंदोबस्तादरम्यानही प्रचंड कामाचा ताण असतो. या स्थितीत समाज आपल्यासोबत आहे, याची ग्वाही देणाऱ्या या उपक्रमाने निश्‍चितच पोलिसांचे बळ वाढते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी विविध पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस कर्मचारी, होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी श्री. बुवा यांच्याहस्ते पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, उपअधीक्षकांना व नंतर अधीक्षक कराळे व आकाश कांकरिया यांच्याहस्ते पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात चिक्कीवाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का समन्वयक अमोल भट यांनी केले.