जळगाव शहरात पावसाची जोरदार ‘बॅटिंग’!

जळगाव शहरात पावसाची जोरदार ‘बॅटिंग’!

जळगाव - तब्बल तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावत जोरदार ‘बॅटिंग’ केली. पहिल्याच दमदार पावसाने सखल भागात पाणी साचल्याने शहर ‘जलमय’ झाले. नाल्यालगतच्या अनेक घरांत पाणी शिरल्याने रहिवाशांची चांगलीच पंचाईत झाली. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत होता. त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला. मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर शहरात पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर अचानक त्याने दडी मारली. यामुळे जळगावकर त्रस्त झाले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून जळगावकर दमदार पावसाची प्रतीक्षा करीत होते. मध्यंतरी पाऊस आला; परंतु काही भागांत पाऊस झाला, तर काही भागात थेंबही पडला नाही. पाऊसच नसल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. पावसाच्या आगमनासाठी शहरातील काही भागांत पारंपरिक ‘धोंडी’ काढून विनवणीही करण्यात आली. मात्र, तरीही वरुणराजा बरसलाच नाही. अखेर जून संपल्यानंतर जुलैच्या सुरवातीलाच त्याने हजेरी लावली. शनिवारी (१ जुलै) पाऊस झाला; परंतु तो तुरळक स्वरूपात होता. दरम्यान, हरिविठ्ठलनगर भागातील संत गजानन महाराज चौकाजवळील खांबात वीजप्रवाह उतरल्याने त्याचा स्पर्श लागून शेळी मृत्युमुखी पडली.

घरांत शिरले पाणी
शाहूनगर भागात नाल्याच्या काठावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांत पाणी शिरले. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने व्यवस्थित नालेसफाई न केल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे नाले तुंबल्याने पाणी रहिवाशांच्या घरांत शिरले; तर शहरातील काही भागांत झाडेही उन्मळून पडली; परंतु सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

नंदगाव परिसरात बळिराजा सुखावला
नंदगाव (ता. जळगाव) येथे गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या वरुणराजाचे आज दमदार पुनरागमन झाले. यामुळे परिसरातील बळिराजा सुखावला. शेतांमध्ये पेरण्या व लागवड पूर्ण झाली असतानाच, पावसाने महिनाभरापासून पाठ फिरवली होती. यामुळे परिसरातील शेतकरी चांगलाच धास्तावला होता. मात्र, आज पावसाने जोरदार पुनरागमन करीत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. नंदगाव परिसरात दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना आधार मिळणार आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जळगावकर झाले चिंब!
बहुप्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने जळगावकर आज चांगलेच सुखावले. योगायोगाने रविवार असल्यामुळे सुटीच्या दिवशी पावसात भिजण्याचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या डबक्‍यांमध्येही बच्चेकंपनी धम्माल करीत होती. पावसात भिजण्याचा मोह प्रौढांनाही आवरता आला नाही. त्यांनीही चिंब होण्याचा आनंद लुटला.

पाणीच पाणी चोहीकडे...
जोरदार पावसाने मात्र जळगावकरांना चांगलाच तडाखा दिला. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. बेंडाळे महाविद्यालय, कोर्ट चौक, नूतन मराठा महाविद्यालय, शाहूनगर, ख्वाजामियाँ परिसर, रेल्वेस्थानक, नटवर टॉकीज चौक, पत्र्या हनुमान चौक परिसरात पाणी साचल्यामुळे चालकांना वाहन चालविणेही कठीण झाले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूकही ठप्प होती. मात्र, काही दुचाकीधारक पाण्यातून मार्ग काढत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com