यंदाच्‍या रक्षाबंधनात ‘हिंदी- चिनी’ नाही ‘भाई-भाई’!

यंदाच्‍या रक्षाबंधनात ‘हिंदी- चिनी’ नाही ‘भाई-भाई’!

जळगाव - डोकलाम मुद्यावरून भारत-चीनदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण होऊन चीनच्या कुरापती वाढल्याचा परिणाम धिम्या गतीने का असेना भारतीय बाजारपेठेत चायनीज वस्तूंवर दिसू लागला आहे. या वस्तू  ग्राहकांअभावी हळूहळू हद्दपार होत असताना आता खुद्द व्यापाऱ्यांनीच चायनीज मालापासून लांब राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. यातच यंदा स्थानिक राखी विक्रेत्या व्यापाऱ्यांनी स्वतःच चायनीज राख्यांची ‘एन्ट्री’ थांबविली असून, त्यांनीच चायनीज राख्यांचा माल नाकारला आहे. परिणामी यंदा राख्यांच्या बाजारपेठेने ‘हिंदी-चिनी भाई-भाई नाही’ म्हणत चीनला एकप्रकारे दणकाच दिला आहे. 

चायनीज मार्केटमधील वस्तूंनी भारतीय बाजारपेठेवर अक्षरशः अतिक्रमण करत संपूर्ण बाजारपेठ व्यापली आहे. भारतीय उत्सव आणि चिनी वस्तू हे तर समीकरणच बनले होते. मात्र यंदा भारत-चीनदरम्यान डोकलाम भागातील घुसखोरीच्या मुद्यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला असल्याने चीनच्या कुरापतींमुळे भारतीयांनी अनेक ठिकाणी चिनी वस्तूंविरोधात बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. या भूमिकेचा परिणाम येत्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत दाखल झालेल्या राख्यांच्या व्यवसायावरही झाला आहे. 

चायनीज राख्यांना ‘ना’
बदलत्या काळात राख्यांचे स्वरूपही बदलले असून, लहान मुलांमध्ये चायनीज राख्यांचे मोठे आकर्षण आहे. मुलांमधून मोठी मागणी म्हणून गेल्या वर्षापर्यंत व्यापारी चायनीज राख्या मोठ्या प्रमाणात मागवायचे. यंदा मात्र व्यापाऱ्यांनीच चायनीज राख्या न मागविण्याचा निर्धार केला आणि त्यामुळे यंदाचे रक्षाबंधन हे चायनीज मालाशिवाय होणार आहे. गेल्यावर्षी पडून असलेला दहा टक्के माल तेवढा व्यापारी विकणार असून, उर्वरित ९० टक्के भारतीय राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. 

रंगबिरंगी राख्या उपलब्ध 
बाजारपेठेत विविध आकार, रंग, छोट्या मण्यांच्या राख्या, कार्टून, मोरपंखी, कुंदन, अभिनेते- अभिनेत्रींची छायाचित्रे असलेल्या राख्या, बालगणेश व हनुमानाच्या राख्या, बॅंड स्टाइल, अशा विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लहान व आकर्षक स्टाइलच्या राख्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. दोरी, बॅंड स्टाइल व मुलांना आवडत्या कार्टून, बेन टेन, डिस्को लाइटच्या राख्यांना विशेष मागणी आहे. 

कार्टूनच्या राख्या
कार्टूनमधील पोकेमॉन, पिकाच्यू, धूम, बॉबीदी बिल्डर, टेडी, स्पायडर मॅन, मोटू- पतलू, डोरेमान अशा प्रकारच्या सुमारे चाळीस विविध नमुन्यांच्या राख्या आहेत. मुलांसाठीच्या लाइटच्या राख्यांना अधिक मागणी आहे. साधारणतः दहा रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्यांचे दर आहेत. शहरात या राख्यांचा माल मुंबई, दिल्ली, कोलकता, राजस्थान, गुजरात येथून मागविला जातो. 

भारतीय राख्यांची चलती
दरवर्षी रक्षाबंधन सणाला बाजारपेठेत सुमारे सात-आठ कोटींची उलाढाल होत असते. यात ६० टक्के उलाढाल भारतीय राख्यांची होते, तर ४० टक्के उलाढाल चिनी राख्यांची होते. मात्र, यंदा भारतीय व्यापाऱ्यांनी चायनीज राख्यांच्या मालाची खरेदी केली नसल्याने भारतीय राख्यांची ‘चलती’ आहे. 

यंदा चिनी वस्तूंवर बहिष्कार असल्याने त्याचा परिणाम राख्यांवरही झाला आहे. ज्या दुकानांवर गतवर्षीच्या चिनी राख्या उपलब्ध आहेत, त्या राख्या घ्यायला नागरिक तयार नाहीत. त्यामुळे चिनी मालावर व्यावसायिक व ग्राहकांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. 
- अभिषेक जैन, विक्रेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com