तांबापुरात घरफोडी 

तांबापुरात घरफोडी 

जळगाव - तांबापुरातील अजमेरी गल्लीत रविवारच्या मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी घर फोडून तेथून २ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. वीजपुरवठा खंडित झाल्याने आईच्या घरी झोपण्यासाठी गेल्यावर पहाटे सेहरीसाठी परतल्यावर चोरी करून दोघे रुमाल बांधलेले चोरटे पळताना दिसले. आरडाओरड केल्यावर रहिवाशांनी त्यांचा पाठलागही केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. औद्योगिक वसाहत पोलिसांतील दोघा कर्मचाऱ्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

तांबापुरा भागातील अजमेरी गल्लीत मुसा किराणाजवळ शेख शाकीर शेख शौकत (वय ४०) पत्नी चाँदबी, मुले शेख सईद व शेख शरीफ व मुलगी आयेशाबी यांच्यासह वास्तव्यास आहेत. शाकीर हे भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सोबतच पत्नी चांदबी, कुटुंबाला आधार म्हणून गोळ्या-बिस्किटे व पापड विक्री करतात. वीजपुरवठा खंडित झाल्याने घरात प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून शाकीर व कुटुंबीय शेजारीच सासरे मुनीर शेख अहमद यांच्या घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले. त्यांनी रविवारी रात्री एकला घराला कुलूपही लावले होते. दरम्यान, तोंडाला रुमाल बांधलेल्या चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर कुलूप तोडून आत प्रवेश करत ऐवज लंपास केला. 

‘सहेरी’ला आल्यावर चोर दिसले
रमजान महिना सुरू असल्याने संपूर्ण कुटुंबीय रोजा करतात. मध्यरात्री २.२५ वाजेच्या सुमारास सहेरीची तयारी करण्यासाठी चाँदबी उठल्या. पाठोपाठ कुटुंबीय जागे झाले. छतावरून खाली उतरत असतानाच तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोर घरातून बाहेर निघताना दिसताच त्यांनी चोर, चोर आरडाओरडा केली. गल्लीत इतरही रहिवासी जागे होऊन घरातून पळालेल्या दोघा चोरट्यांचा बराचवेळ पाठलाग करण्यात आला, मात्र निमुळत्या गल्ल्या आणि गडद अंधाराचा गैरफायदा घेत चोरटे पसार झाले. 

‘स्कार्फ’ आढळला
राहत्या घरातून चोरी करून पळणारे दोघे चोरटे डोळ्यांदेखत पळाल्याने तांबापुराच्या दाट वस्तीत एकच गोंधळ उडाला. शाकीर शेख यांच्यासहित गल्लीतील इतर तरुण चोरट्यांच्या मागावर होते.

रात्रभर शोध घेतल्यावरही चोरटे मिळून आले नाही. अर्थात दोन्ही चोर त्याच परिसरातील असल्याची पोलिसांसह रहिवाशांची खात्री झाली. पळून जाणाऱ्या एका चोरट्याचे केस सोनेरी रंगाचे व दुसरा काळसर रंगाचा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. पाठलाग करताना चोरट्यांनी तोंडाला बांधलेला रुमाल मिळून आला असून तो, ज्या घरात चोरी झाली तेथूनच चोरट्यांनी घेतल्याचे निष्पन्न झाले. 

दोन संशयित पोलिसांच्या तावडीत 
गुन्हा घडल्यावर पोलिस कर्मचारी अश्रफ शेख, सचिन मुंडे यांनी प्राप्त माहितीच्या आधारे निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनात भुरे केस केलेला निसार तडवी व त्याचा साथीदार मधू भिल या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरलेला ऐवज घेऊन पळून जाताना एका ठिकाणी तो दडवून ठेवला होता. तेथे शोध घेतला. मात्र पोलिसांना काही मिळून आले नाही. तर दुसरी जागा दोघांनी दाखवली मात्र तेथेही काहीच आढळले नाही. 

सून, मुलीसाठी जमवले दागिने
शेख शाकीर व त्यांच्या पत्नी यांनी गेल्या तेरा ते चौदा वर्षांपासून भाजीपाला व पापड विक्री करून काबाड कष्टातून, काही दागिने केले होते. मोठा मुलगा शेख सईद याचा नुकताच साखरपुडा झाला असून रमझान ईदनंतर विवाह आहे, त्याच्या लग्नासाठी आणि सुनेसाठीचा दागिना, लहान मुलगी आयेशाबी साठी केलेले दोन दागिने त्यात २ तोळे सोने व ९०० ग्रॅम चांदी आणि अनेक दिवसांपासून गोळा करीत असलेली रोख रक्कम, आतल्या खोलीतील पाकिटातून रोख रक्कम असा एकूण सव्वा ते दीड लाखांचा ऐवज  चोरट्यांच्या हाती लागल्याने पती-पत्नी हवालदिल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com