खडसे भाजपमध्ये फार काळ नाहीत -  संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जळगाव - राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे कोणत्या पक्षात जातील, हे माहीत नाही. परंतु, ते आता फार काळ भारतीय जनता पक्षात राहणार नाहीत, हे निश्‍चित आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी केला. खडसे शिवसेनेत येत असतील, तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जळगाव - राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे कोणत्या पक्षात जातील, हे माहीत नाही. परंतु, ते आता फार काळ भारतीय जनता पक्षात राहणार नाहीत, हे निश्‍चित आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी केला. खडसे शिवसेनेत येत असतील, तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

खासदार राऊत हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. सायंकाळी त्यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की खडसे यांनीच शिवसेना- भाजपची युती तोडली. याबाबतची घोषणा करताना त्यांना आनंद वाटला. कदाचित त्यांना आपण मुख्यमंत्री होऊ, असे वाटले होते; परंतु पक्षाने त्यांना मुख्यमंत्री तर केलेच नाही, उलट आज मंत्रिपदही राहिलेले नाही. त्यांना शिवसेनेविषयी ममत्व नसले, तरी आमची आज खडसेंविषयी निश्‍चित सहानुभूती आहे. सद्यःस्थितीत पक्षातील त्यांची स्थिती पाहता ते फार काळ भाजपमध्ये राहणार नाहीत. ते कोणत्या पक्षात जातील, हे माहिती नाही. अजित पवार त्यांच्या कानात काही सांगतात, ते पवारांना टाळी देतात. त्यामुळे त्यांचे हे संबंध त्यांना लखलाभ. खडसे शिवसेनेत येत असतील, तर त्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. आमच्याकडे इनकमिंग जोरात सुरू आहे, त्यामुळे त्यांचेही स्वागत करू. 

कोरेगाव भीमा दंगलीबाबत खासदार राऊत म्हणाले, की हे सहज घडलेले नाही. पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत त्याची ठिणगी पडली आहे. उमर खालिद याचा काहीही संबंध नसताना त्याला या परिषदेला बोलाविण्यात आले. अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर त्याची सहानुभूती ठेवून श्राद्ध घालण्याचे काम या खालिदने केले. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने नियोजनबद्ध पद्धतीने भडक वक्तव्य केले, त्यामुळे याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी आहे. 

बापटांच्या तोंडी भाजपची भूमिका 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी वर्षभरानंतर सत्ता राहणार नाही, असे भाकीत वर्तविले आहे. ते आज म्हणत आहेत, शिवसेना अगोदरपासूनच हे सरकार वर्षभरानंतर सत्तेवर राहणार नाही, असे सांगत आहे. भाजपचीही भूमिका तीच आहे. बापटांच्या तोंडून ती बाहेर पडली एवढेच, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Web Title: jalgaon news sanjay raut eknath khadse BJP