कर्जमुक्‍ती, हमीभावासाठी उद्या राज्यस्तरीय शेतकरी परिषद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जळगाव - शेतकऱ्यांना कापसाला सात हजार रुपये हमीभाव मिळावा, यासाठी उपोषणाला बसलेले मंत्री गिरीश महाजन आज 4100 रुपये भाव मिळतोय, असे सांगत आहेत; पण शेतकऱ्यांना हमीभाव व कर्जमुक्‍ती यावर उत्तर द्यायला पुढे येत नाहीत. दुसरीकडे राज्य सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर केली असून, रोज नियम बदलत आहेत. याच्या विरोधात एल्गार म्हणून जळगावात मंगळवारी (ता. 26) राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्‍ती व हमीभाव परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे म्हणाल्या, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करत रोज नवीन नियम काढून फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्याला आता पुन्हा चावडी वाचनावर वेळ वाया घालविले जात आहे. या चावळी वाचनात प्रत्यक्ष शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधी व शेतकरी प्रश्‍नांशी निगडित व्यक्‍ती परिषदेनिमित्ताने येणार आहे. शेतकरी कर्जमाफी व हमीभाव याकरिता होणारी राज्यस्तरीय परिषद मंगळवारी (ता. 26) नूतन मराठा महाविद्यालयाच्या बोस सभागृहात दुपारी होणार आहे. या परिषदेसाठी रघुनाथ पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, डॉ. अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.