बॉश कंपनीच्या कामगाराची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

जळगाव - बांभोरी (ता. धरणगाव) येथील बॉश कंपनीत कार्यरत सव्वीस वर्षीय तरुण कामगाराने शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पिलखेडा (ता. जळगाव) येथे कुटुंबासह ते वास्तव्यास होते, पत्नी शेतातून घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

पिलखेडा येथील रहिवासी विपुल रघुनाथ साळुंके (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या सात वर्षांपासून ते बॉश कंपनीत कार्यरत आहे. आज सुटी असल्याने त्यांनी शेतात कपाशीची फवारणी केली. नंतर दुपारी घरी आले. पत्नी आणि आई शेतात असल्याने विपुल घरात एकटेच होते. आतून घराचे दार बंद करीत गळफास घेतला. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या पत्नी पूनम शेतातून घरी परतल्यावर आतून दरवाजा बंद होता. सुरवातीस त्यांनी आवाज दिला, नंतर दार ठोकले, काही एक उपयोग न झाल्याने त्यांनी गल्लीतील शेजाऱ्यांना सांगितल्यावर तरुणांनी दार उघडल्यावर विपुलचा मृतदेह दिसताच पत्नीने आक्रोश केला. 

नातेवाइकांची गर्दी 
सायंकाळी विपुल यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी बांभोरी तसेच पिलखेडा येथील नातेवाईक आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. विपुल यांचे मोठे बंधू रवींद्र साळुंके सुद्धा याच कंपनीत कार्यरत आहेत. विपुलच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबीयांना आक्रोश अनावर झाला होता. तालुका पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.