ऑनलाइन कामांविरुद्ध गुरुजींचा एल्गार..!

online
online

जळगाव : विद्यार्थ्यांसह स्वतःची व शाळेतील पटसंख्या, माध्यान्ह भोजन व त्याचा दर्जा यासह इतर अनेक मुद्यांवरील माहिती "सरल' प्रणालीअंतर्गत "ऑनलाइन' भरणे शिक्षकांना बंधनकारक करण्यात आली आहे. तथापि, या माहितीच्या व्यापामुळे शिक्षकांच्या अध्यापनासारख्या मूळ कामांवर विपरीत परिणाम होऊन मुख्याध्यापकासह शिक्षकही तणावाखाली जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच चाळीसगाव तालुक्‍यातील शिक्षकाच्या आत्महत्येची भयानक घटना सोमवारी (ता. 30) घडली. त्यामुळे आता या क्‍लिष्ट व त्रासदायक ठरणाऱ्या "ऑनलाइन' कामाविरुद्ध शिक्षकांनी एल्गार पुकारत बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. 

शासनाच्या शिक्षण विभागाच्या विविध योजना आता "ऑनलाइन' करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 841 शाळा आहेत. याशिवाय खासगी शाळाही आहेत. या शाळांमधून विविध योजनांची माहिती पूर्वी लेखी स्वरूपात पाठवावी लागत होती. त्यामुळे माहिती मिळण्यासाठी मोठा कालावधी लागत होता. मात्र, आता शासनाने शिक्षण विभागासाठी असलेल्या बहुतांश योजना "ऑनलाइन' केल्याने त्यांनी माहिती वेळेवरच संगणकावर भरावी लागत आहे. 

तंत्रज्ञानाने वाढविला ताण 
"सरल' योजनेत विविध 23 मुद्यांवर ऐंशीपेक्षा अधिक प्रश्‍नांची माहिती भरावी लागत असून, ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळत नसल्यामुळे तातडीच्या माहितीसाठी शिक्षकांचा मुक्काम सायबर कॅफेमध्येच होऊ लागला आहे. परंतु, एकामागून एक येणारे "ऑनलाइन' काम यामुळे शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. या ताणातूनच देशमुखवाडी (ता. चाळीसगाव) येथील आबासाहेब चौधरी या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळेच "ऑनलाइन' कामाचा शिक्षकांना होणारा जाच प्रकर्षाने समोर आला आहे. 

शनिवारी मूकमोर्चा 
"सरल'च्या जाचावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीची बैठक ग. स. सोसायटीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने शाळास्तरावर करण्यात येणारी "ऑनलाइन' कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी. शिक्षकांच्या बदल्या अवश्‍य व्हाव्यात, परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून 27 फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णयात दुरुस्ती व्हावी. संगणक अर्हता पास होण्याची मुदत डिसेंबर 2018 अखेर वाढवून मिळावी. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागण्यांसाठी शनिवारी (ता.4) जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एकला मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. बैठकीत अजबसिंग पाटील, रवींद्र पाटील, सुनील जाधव, पाकिजा पटेल, बापू साळुंके, किशोर पाटील कुंझरकर, विजय बागूल आदी उपस्थित होते. 

"ऑफलाइन' कामासाठी पुढाकार 
शासनाने शिक्षक, विद्यार्थी व शाळास्तरावरील संपूर्ण माहिती "ऑनलाइन' भरण्यासाठी जी "सरल' प्रणाली अमलात आणली आहे. त्यात माध्यान्ह भोजन, हजेरीसाठीची स्टॉर्म प्रणाली, शिष्यवृत्तीची माहिती व शाळा सिद्धीसाठी सविस्तर माहिती भरावी लागत आहे. या सर्व कारकुनीचा परिणाम शिक्षकांच्या मूळ कामावर होत असून, "सरल'ची कामे शिक्षकांना मानसिक छळाप्रमाणे वाटू लागली आहेत. यामुळे "ऑनलाइन' ऐवजी "ऑफलाइन'द्वारेच काम करण्याची भूमिका शिक्षकांकडून घेण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com