सदोष वृक्षारोपणामुळे संवर्धनाचे ‘तीनतेरा’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

जळगाव - वृक्षारोपण व संवर्धनाबाबत समाजातील अनेक घटक चर्चा करताना दिसतात, वृक्षारोपणाचे उपक्रमही उदंड होतात. त्यामुळे या विषयावर जनजागृती बऱ्यापैकी झाल्याचे चित्र वरवर दिसत असले तरी ते फसवे आहे. प्रत्यक्षात सदोष वृक्षारोपणामुळे पुढे त्यांचे संवर्धनच होत नाही, शिवाय प्रसिद्धीपुरत्या उपक्रमांमुळेही या गरजेच्या विषयात गांभीर्य राहत नाही, अशी स्थिती आहे. 

जळगाव - वृक्षारोपण व संवर्धनाबाबत समाजातील अनेक घटक चर्चा करताना दिसतात, वृक्षारोपणाचे उपक्रमही उदंड होतात. त्यामुळे या विषयावर जनजागृती बऱ्यापैकी झाल्याचे चित्र वरवर दिसत असले तरी ते फसवे आहे. प्रत्यक्षात सदोष वृक्षारोपणामुळे पुढे त्यांचे संवर्धनच होत नाही, शिवाय प्रसिद्धीपुरत्या उपक्रमांमुळेही या गरजेच्या विषयात गांभीर्य राहत नाही, अशी स्थिती आहे. 

पावसाळा सुरू झाला की, वृक्षारोपणाच्या उपक्रमांनाही ऊत येतो. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मृगधारांनी चांगली हजेरी लावल्यानंतर हे उपक्रम सुरू झाले. विविध संघटना, संस्थांनी पुढाकार घेत वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले, त्याला प्रसारमाध्यमांमधून व्यापक प्रसिद्धीही मिळाली. शहराला हिरवेगार करण्याच्या दृष्टीने अशा स्वरूपाचे उपक्रम गरजेचेही आहेत. शासनानेही हा विषय गांभीर्याने घेत गेल्यावर्षी १ जुलैस राज्यात २ कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट घेऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला होता. 

संवर्धनाबाबत साशंकता
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासन आणि संस्थाही वृक्षलागवड दरवर्षी करत असतात. प्रत्यक्षात, त्यापैकी किती वृक्ष लागले व कितीचे संवर्धन झाले हा भाग निराळा. विविध संस्थांचा वृक्षारोपणाच्या उपक्रमांमधील उत्साह तसा चांगला असतो. नंतर मात्र, या झाडांचे काय होते, याबाबतही शंका आहे. 

वृक्षारोपणाची शास्त्रोक्त पद्धत नाहीच
प्रत्यक्षात वृक्षारोपण करताना त्या-त्या ठिकाणच्या स्थितीनुसार, विविध प्रकारची झाडे लावली पाहिजे. परंतु, त्याबाबत अभ्यास न करता सरधोपटपणे कुठेही, कोणत्याही जागेवर, कुठलीही वृक्ष लावली जातात. नंतर ती त्याठिकाणी जगत नाहीत, तर काही ठिकाणी संरक्षक भिंत, रस्ते अथवा गटारांमुळे अडचण निर्माण झाल्याने तोडावी लागतात. अशा स्थितीत किती वृक्षांची लागवड होते, किती झाडांकडे लक्ष दिले जाते, किती संवर्धित होतात आणि किती झाडांना नंतर तोडावे लागते, याचा आढावा घेतला तर वृक्षसंवर्धनाचे प्रमाण अवघे दहा टक्केही दिसणार नाही. 

ही आहे योग्य पद्धत
साधारण १२ मीटर रुंदीचा रस्ता असेल तर या रस्त्याच्या एकाच बाजूला वृक्ष लागवड करावी
१२ मीटर रस्त्यालगत ज्या बाजूने जलवाहिनी, गटार अथवा भिंत नाही, अशा बाजूनेच झाड लावावे
१२ मीटर रस्त्यालगत फुलझाडे लावण्यावर भर दिला पाहिजे
१५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्याला दुतर्फा मोठी झाडे लावता येतील, त्यासाठी भिंत, गटारे व जलवाहिनी बघून घ्यावी
रस्ता २५ मीटर रुंद असेल तर रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध दुभाजकांतही वृक्ष लावली पाहिजे. दुतर्फा मोठी वृक्ष, व मध्ये शोभेच्या फुलझाडांची वृक्ष लावणे योग्य आहे