उपायुक्तांना बटाट्याचा हार घालण्याचा प्रयत्न

उपायुक्तांना बटाट्याचा हार घालण्याचा प्रयत्न

जळगाव - महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर देखील प्रशासनाने बैठकीचा अजेंडा का पाठविला, असा सवाल उपस्थित करत मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्याशी वाद घातला. यावरून प्रशासनाच्या कार्याचा निषेध व्यक्त करत उपायुक्तांना बटाट्याचा हार घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, उपायुक्त खोसे यांनी धमकी दिल्याचा आरोप नन्नवरे यांनी केला आहे. 

महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक गेल्या काही दिवसांपासून अधिकारी येत नसल्याने होऊ शकलेली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे समितीला अर्थच उरला नसल्याचा आरोप करत नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी सदर समितीचा राजीनामा समिती सदस्य उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्याकडे गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानंतर देखील सदर समितीची सभा तहकूब झाली होती. ही तहकूब झालेली सभा आज दुपारी बाराला आयोजित केली होती. पण, सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच नगरसेवक नन्नवरे व उपायुक्‍त खोसे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. 

सभेचे कामकाज उशिराने 
वृक्ष प्राधिकरण समिती सभेसाठी सदस्य नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, संदेश भोईटे, अजय पाटील, नितीन बरडे हे वाट बघत थांबले होते. यावेळी नितीन नन्नवरे देखील उपस्थित झाले होते. सभेचे ठिकाण उपायुक्तांच्या दालनाला कुलूप असल्याने नन्नवरे संतापले. बराच वेळानंतर उपायुक्त खोसे, प्रभाग अधिकारी संजय पाटील, योगेश वाणी आले. त्यानंतर सभा सुरू होण्यापूर्वीच नन्नवरे यांनी अजेंडा का पाठविला अशी विचारणा केली. यावर खोसे यांनी राजीनामा मंजूर केला नसून, महासभेत ठेवावा लागेल असे सांगितले. नन्नवरे यांनी तुम्ही मंजूर करू शकता, अशी आग्रही भूमिका घेतली. यावरून दोघांमध्ये वाद झाला असता संतप्त झालेल्या नन्नवरे यांनी बटाट्याचा हार खोसे यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. खोसे यांनी त्यास विरोध केला. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

सभेत ९६ प्रस्ताव मंजूर
सभेत झालेल्या गोंधळानंतर पार पडलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत ९६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात ४६ प्रस्ताव वृक्ष तोडीचे होते. तर ५० प्रस्ताव फांद्या तोडण्याचे आहेत. १२ प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीचे आहेत.

उपायुक्तांनी धमकावल्याचा आरोप
उपायुक्त खोसे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना हार घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी अर्वाच्य भाषेत ‘नसते उद्योग करू नका, तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी दिल्याचा आरोप नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी केला. तर नगरसेवक नितीन नन्नवरे हे बटाट्याचा हार घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांना विरोध केला. पण, कुठलीही धमकी दिली नसल्याचे उपायुक्त खोसे यांनी सांगितले.

उपायुक्‍तांवर कारवाई का नाही?
प्रशासनातील अधिकारी उशिरा येत असल्याने सभा तीनवेळा तहकूब करण्यात आली. पण इतर कर्मचारी उशिरा आल्यास प्रभारी आयुक्त निंबाळकर त्यांच्यावर कठोर कारवाईची नोटीस बजावतात. मग आज बैठकीला उशिरा आलेल्या उपायुक्त खोसे यांच्यासह अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी; अशी मागणी भाजप नगरसेवक तथा वृक्ष प्राधिकरण सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. तसेच उपायुक्‍तांनी नन्नवरेंना एकेरी संबोधल्याचा त्यांनी निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com