चाळीसगाव: विजेचा धक्क्याने दोन तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू 

अर्जुन परदेशी
शनिवार, 26 ऑगस्ट 2017


रानडुकरांसाठीचा सापळा ठरला जीवघेणा 
विविध प्रकारचे प्रयोग करुनही रानडुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी तारांचा सापळा रचून त्यात विद्युत प्रवाह उतरवतात. मात्र, हा सापळा शेतकऱ्यांसाठीच जीवघेणा ठरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावातील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाकडे पाठ फिरविली होती. रात्री गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. दोन्हींच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. 

चाळीसगाव छ रानडुकरांपासून पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी शेताच्या भोवती लावलेल्या तारांमध्ये सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून दोन तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ओढरे (ता. चाळीसगाव) शिवारात घडली. या घटनेत एका बैलाचाही मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत माहिती अशी, पाटणादेवी गावाजवळील ओढरे (ता. चाळीसगाव) शिवार हा जंगलालगतचा भाग आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतांमध्ये रानडुकरांचे कळपच्या कळप शेती पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यापासून बचाव म्हणून आप्पा जाधव व बळीराम जाधव यांच्या शेताच्या बांधावर तारा लावून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आलेला होता. आज दुपारी चारच्या सुमारास योगेश प्रल्हाद राठोड (वय 30) व दत्तू रतन राठोड (वय 32) हे तरुण शेतकरी गुरे चारण्यासाठी या शिवारात आलेले होते. दुपारी पावसाच्या पाण्याचा शिडकावा पडल्यानंतर चारच्या सुमारास हे दोघेही आपल्या सोबतची बैलजोडी घेऊन घराकडे परत निघाले. शेताच्या बांधजवळ रानडुकरांसाठी शेतकऱ्यांनी विजेचा प्रवाह असलेल्या तारा अंथरल्या होत्या. त्याची माहिती या दोन्ही शेतकऱ्यांना नसल्यामुळे या तारा त्यांच्या संपर्कात आल्याने सुरवातीला योगेशला शॉक लागला. त्याच्यासोबत असलेल्या बैलालाही शॉक लागल्याने दोन्हीही तारेला चिकटले. हा प्रकार जवळच असलेल्या दत्तूच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्याला देखील शॉक लागला व दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. अशातच एक बैल वीज प्रवाहापासून दूर राहिल्याने बचावला. 

योगेश सैन्यातील जवान 
योगेश राठोड याच्या शेतात कपाशीची नांगरणी करण्यासाठी तो सकाळपासूनच बैलजोडी घेऊन गेलेला होता. सोबत शेतीकामाला मदत म्हणून त्याने दत्तू राठोडलाही नेले होते. दुपारनंतर पावसाचा शिडकावा झाल्याने चारच्या सुमारास ते घराकडे परतत असताही ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मयत योगेश राठोड हा सैन्य दलातील जवान होता. मात्र, सुमारे दीड वर्षांपासून तो घरीच शेती करायचा. योगेशला मुलगी तर दत्तू राठोडला मुलगा आहे. 

रानडुकरांसाठीचा सापळा ठरला जीवघेणा 
विविध प्रकारचे प्रयोग करुनही रानडुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी तारांचा सापळा रचून त्यात विद्युत प्रवाह उतरवतात. मात्र, हा सापळा शेतकऱ्यांसाठीच जीवघेणा ठरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावातील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाकडे पाठ फिरविली होती. रात्री गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. दोन्हींच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.