‘उमवि’ परीक्षांच्या निकालांमध्ये ‘सुपरफास्ट’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

७८३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर; राज्यात ठरले अग्रेसर

७८३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर; राज्यात ठरले अग्रेसर

जळगाव - मार्च, एप्रिल, मे २०१७ या महिन्यांमध्ये विविध विद्या शाखांच्या घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांपैकी ५८० परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत, तर अन्य २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रातील ‘सुपरफास्ट’ आणि अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची संधी वाया जाऊ नये, यासाठी यावर्षी प्रथमच पुनर्मूल्यांकनासाठी जलदगती (फास्ट ट्रॅक) पद्धतीचा अवलंब करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. मुदतीच्या आत परीक्षांचे निकाल जाहीर करून विद्यापीठाने राज्यात ‘उमवि पॅटर्न’ निर्माण केला आहे.

विद्यापीठात विविध विद्या शाखेअंतर्गत मार्च ते मे या कालावधीत ७८३ परीक्षांसाठी एक लाख ५८ हजार विद्यार्थी बसले होते. १७ मार्च ते ६ जून या कालावधीत ८२ दिवसांत सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्या. एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., विधी तसेच अभियांत्रिकी आणि औषधी निर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर या अभ्यासक्रमांच्या एक हजार ६६५ विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचे वितरण ऑनलाइन (डिजिटल एक्‍झामिनेशन पेपर डिलिव्हरी सिस्टिम) करण्यात आले; तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आल्या. उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्यासाठी विद्यापीठाने एकूण ११ मूल्यांकन केंद्रे निश्‍चित केली. 

विक्रमी पुनर्मूल्यांकन
अभियांत्रिकी व तांत्रिकी, शिक्षणशास्त्र, विधी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्या शाखांच्या पदवी, पदव्युत्तर वर्ग, बी.एस्सी. आदी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे सुमारे ३ लाख ९५ हजार ४२६ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन करण्यात आले तर ७० हजार ३९६ उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन ऑनलाइन करण्याचा नवा विक्रम विद्यापीठाने यंदा केला आहे. उर्वरित विद्या शाखांच्या व काही अभ्यासक्रमांच्या दोन लाख १३ हजार ८९८ उत्तरपत्रिका पारंपरिक पद्धतीने तपासण्यासाठी विद्यापीठात केंद्रीय मूल्यांकन प्रकल्प आयोजित करून मूल्यांकन करण्यात आले.

फास्ट ट्रॅक पद्धती
विद्यार्थीहित लक्षात घेऊन विशेषतः एम.एस्सी प्रवेशासाठी निर्धारित मुदतीच्या आत विद्यार्थ्यांना अर्ज करता यावेत, यासाठी बी.एस्सी अंतिम वर्षाच्या पुनर्मूल्यांकनासाठी यावर्षी प्रथमच जलदगती (फास्ट ट्रॅक) पद्धतीचा अवलंब करण्यात आला. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी आणि वास्तुशास्त्र या व्यतिरिक्त इतर सर्व विषयांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालही जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे पुढील परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या आत हे निकाल जाहीर झाले आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी आणि वास्तुशास्त्र यांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालही पुढील परीक्षा अर्ज भरण्याच्या आत जाहीर केले जातील, अशी माहिती डॉ. धनंजय गुजराथी यांनी दिली.

डिजिटलकडे वाटचाल
माहिती व तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता विद्यापीठाचा परीक्षा व मूल्यमापन विभाग अधिक डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. परीक्षेसंदर्भातही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाते. परीक्षा अर्ज भरणे, हॉल तिकीट मिळविणे, उत्तरपत्रिकांची प्रत ऑनलाइन मिळवणे, निकाल ऑनलाइन पाहणे यांसारख्या बाबी विद्यार्थी आता कोठेही असला तरी ऑनलाइन करू शकतो. यासोबतच विद्यापीठाने आता ‘एनएमयू मोबाईल ॲप’ उपलब्ध करून दिले आहे.

Web Title: jalgaon news umavi exam result superfast