जळगावच्या विकासावर आज मंत्रालयात उकल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

जळगाव - महापालिकेच्या निधीबाबत विविध प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे जळगावचा विकास ठप्प झाला आहे. या सर्व प्रश्‍नांची उकल करण्यासाठी उद्या (१८ सप्टेंबर) जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, सभागृह नेते रमेश जैन मुंबईला रवाना झाले आहेत.

जळगाव महापालिकेचे हुडको कर्जासह अनेक प्रश्‍न प्रलंबित असल्याने शहराचा विकास ठप्प आहे. मुंबईत मंत्रालयात त्या प्रश्‍नांची अधिकाऱ्यांसोबत तड लावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्या (१८ सप्टेंबर) बैठक आयोजित केली आहे. जळगावचे आमदार भोळे, महापौर कोल्हे, सभागृह नेते रमेश जैन तसेच महापालिकेचे प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 

याबाबत माहिती देताना महापौर कोल्हे यांनी सांगितले, की आपण या बैठकीसाठी रात्री मुंबईला रवाना होत आहोत. शिवाजीनगर, पिंप्राळा उड्डाणपूल, विकास आराखड्याचा साडेचारशे कोटी रुपये निधी, हुडको कर्जाची फेड याबाबत चर्चा करण्यात येईल. याशिवाय अमृत योजनेबाबत न्यायालयात प्रश्‍न प्रलंबित आहे, त्याबाबत शासनाने भूमिका घ्यावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला पंचवीस कोटींचा निधी पालिककडे द्यावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी आहे, या रस्त्यासाठी स्वतंत्र हेड अंतर्गत निधी देण्यात यावा, अशी मागणीही त्यांच्याकडे करण्यात येणार आहे.