कायदा पाळणारी पिढी घडवण्याची जबाबदारी गुरुजनांवर - कुलगुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जळगाव - घडणारे गुन्हे व त्यातून समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असणारे अधिकारी जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहेत. संवेदनशील अधिकारी आल्यावर कामांची सुरवात कशी होते ते आज आयोजित कार्यक्रमावरून निदर्शनास येते. त्यामुळे पोलिस दलाच्या या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करताना कायदा पाळणारी पिढी घडवण्याची जबाबदारी आम्हा गुरुजनांवर असून, ते कर्तव्य नक्कीच पार पाडले जाईल, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी केले. 

जळगाव - घडणारे गुन्हे व त्यातून समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असणारे अधिकारी जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहेत. संवेदनशील अधिकारी आल्यावर कामांची सुरवात कशी होते ते आज आयोजित कार्यक्रमावरून निदर्शनास येते. त्यामुळे पोलिस दलाच्या या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करताना कायदा पाळणारी पिढी घडवण्याची जबाबदारी आम्हा गुरुजनांवर असून, ते कर्तव्य नक्कीच पार पाडले जाईल, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी केले. 

जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित जनजागृती परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.  पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून रस्ते अपघात, महिला अत्याचार व सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात आज (ता.३) मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात हा परिसंवाद झाला. विचारमंचावर श्री. कराळे, अप्पर अधीक्षक बच्चन सिंह, प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, रशीद तडवी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी उपस्थित शिक्षकवृंद आणि प्राध्यापकांसमोर जिल्ह्याची विदारक सद्यःस्थिती मांडली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू म्हणाले की, अपघात घडला की, तेवढ्यापुरती चर्चा होते कायमस्वरूपी उपाययोजना मात्र होत नाही. रस्ता सुरक्षा, महिलांविषयी गुन्हे व सायबर गुन्हेगारी केवळ पोलिसांची जबाबदारी नसून त्यासाठी समाजातील आपल्यासारख्या विचारवंतांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. पोलिस दलाच्या सकारात्मक पावलांना शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटक मदत करतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सायबर महायुद्ध घातक 
सायबर गुन्हेगारीवर बोलताना प्रा. इकबाल शेख म्हणाले, पूर्वीसारखी लूट, हल्ले करून लूटमार न होता आता सेकंदात ऑनलाइन पद्धतीने रक्कम लांबवली जाते. एकच चुकीचा संदेश, अफवा पसरवून अप्रिय घटना ओढवू शकतो त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात सायबर गुन्ह्यांबाबत जागृती कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे.  

पोलिस मित्र संकल्पना राबवावी
एम. जे. कॉलेजचे प्राचार्य उदय कुळकर्णी यांनी चर्चेत सहभाग घेताना पोलिस मित्र संकल्पनेची व्याप्ती वाढवण्याची सूचना केली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाच पोलिस मित्र करण्यात आले तर त्यांच्या शिस्तीचा उपयोग होईल, असे मत नूतन मराठाचे प्राचार्य ए. पी. देशमुख यांनी मांडले. शाळा महाविद्यालयाच्या वेळात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी प्रा.आसिफ पठाण यांनी केली.   

शॉर्ट फिल्मचा उपाय 
व्हॉटस्‌ॲप, फेसबुकच्या माध्यमातून ३-४ मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार कराव्यात, त्याद्वारे वाढते अपघात, सायबर गुन्हेगारी आणि महिला अत्याचार, छेडखानीवर जनजागृती करण्यात यावी. शहरात ट्रिपलसीट फिरणाऱ्या काही लोकांवर कठोर कारवाईचा निर्णय पोलिस दलाने घेतल्यास तो प्रकारही बंद होईल, असे मत यजुर्वेंद्र महाजन यांनी मांडले. ॲड. सूरज चौधरी यांनी त्याला दुजोरा देत रोटरीच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासनही दिले. अपघातमुक्त जिल्ह्यासाठी व्यसनमुक्तीवर भर दिला गेला पाहिजे, असे पितांबर भावसार यांनी सांगितले. अल्पवयीन मुलांना वाहने देणाऱ्या पालकांच्या जनजागृती करणेही अपेक्षित आहे.