ठकबाज साखळीतील परभणीचा तरुण ताब्यात 

ठकबाज साखळीतील परभणीचा तरुण ताब्यात 

जळगाव - ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील संशयित निशांत कोल्हेच्या संपर्कातील परभणीच्या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, साई पांचाळ असे या ठकबाजाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची सायबर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चौकशी सुरू होती. 

केवळ ऑनलाइन तंत्रज्ञानावर आधारित या गुन्ह्यात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील तरुण सक्रिय असून, वित्तीय कंपन्यांच्या ग्राहकांची गुप्त माहिती संकलित करून त्यांनी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची ठकबाजी केली आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बिलियन डॉलर्सचे व्यवहारही या संशयितांमार्फत झाले आहेत. 

बजाज फायनान्सच्या जैरुद्दीन बदरुद्दीन शेख (औरंगाबाद) यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिसांनी निशांत तेजकुमार कोल्हे (वय 18) याला ता. 18 मेरोजी अटक केली होती. पहिल्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत सायबर तज्ज्ञांच्या मदतीने निशांतचे उपद्‌व्याप शोधून त्याच्या घरून संगणक संच, एक अश्‍लील साहित्याचे पार्सल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. गुन्ह्याची व्याप्ती आणि संशयिताच्या साखळीत राज्यासह देशभरातील ठकबाज सहभागी असल्याचा पोलिसांचा कयास आहे. 

ठकबाज एकमेकांच्या संपर्कात 
हे सर्व ठकबाज फेसबुक मेसेंजरद्वारेच एकमेकांच्या संपर्कात आहेत. वित्तीय कंपन्यांच्या ग्राहक, कार्डधारकांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसह, वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेबसाइट हॅक करण्याच्या टूल्स्‌ची माहिती एकमेकांना शेअर करण्यात आली आहे. निशांत कोल्हे याच्या संपर्कातील तसेच ठकबाज साखळीत सक्रिय सदस्य असलेला परभणी येथील साई पांचाळ याला रामानंदनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह सायबर तज्ज्ञांचे पथक रात्री उशिरापर्यंत या तरुणांची विचारपूस करीत होते. 

इतर ठकबाजांचा शोध 
संशयित निशांत कोल्हे याच्या संपर्कातील इतर संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, स्थानिक जळगाव शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील चार ते पाच तरुणांची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. ऑनलाइन डाके टाकून वित्तीय कंपन्या, ऑनलाइन शॉपींच्या वेबसाइटला चुना लावणाऱ्यांची सायबर सेलसह पुणे येथील प्रोफेशनल तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने माहिती काढण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com