विवाहिता छळप्रकरणी नऊ जणांना कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

सासू-सासऱ्यांसह पतीचा समावेश; दंडाची रक्कम पीडितेस देण्याचे आदेश
जळगाव - शाहूनगरातील नवविवाहितेच्या छळप्रकरणी सासू-सासरे, पतीसह सासरच्या नऊ जणांना न्यायालयाने वर्षभर सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. साक्षीदारांची साक्ष व प्राप्त पुराव्यांच्या आधारे या शिक्षेसह पीडितेस पंधरा हजार रुपये देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सासू-सासऱ्यांसह पतीचा समावेश; दंडाची रक्कम पीडितेस देण्याचे आदेश
जळगाव - शाहूनगरातील नवविवाहितेच्या छळप्रकरणी सासू-सासरे, पतीसह सासरच्या नऊ जणांना न्यायालयाने वर्षभर सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. साक्षीदारांची साक्ष व प्राप्त पुराव्यांच्या आधारे या शिक्षेसह पीडितेस पंधरा हजार रुपये देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

शाहूनगर नुरानी मशिदीमागे वास्तव्यास असलेले हाजी अकबर मेहबूब बागवान यांचा लहान मुलगा इम्रान याचा विवाह शहरातीलच बुशराबी (वय २०) हिच्याशी २३ जानेवारी २०११ ला झाला होता. पती इम्रान याचा स्पेअरपार्ट विक्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांनी व्यवसायात मंदी आल्याने त्याने माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी पत्नी बुशराबी हिचा छळ सुरू होता. दीड वर्षाने बुशराबी माहेरी निघून गेली. 

यांच्याविरुद्ध गुन्हा व खटला
दरम्यान, तिच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती इम्रानखान अकबरखान बागवान (वय २५), जेठ सलीम खान (२६), मध्यस्थी याकूब ऊर्फ बांगी दाऊदखान (३४), सासू फेहमेदाबी (५५), सासरे हाजी अकबर खान मेहबूब बागवान (६०), जेठ मुस्तफा (३०), जेठाणी शमिना (२३), शाईनबी (२५), नणंद नूरजहाँ जूनेद बागवान (२३), अंजुम मोहम्मद बागवान (२०) आदी दहा संशयितांविरुद्ध कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल होऊन खटल्याचे कामकाज न्या. प्रतिभा पाटील यांच्यासमोर सुरू होते. आज याप्रकरणी न्यायालयाने प्राप्त तक्रारीला अनुसरून पुरावे, दस्तऐवज साक्षीदारांची साक्ष याआधारे संशयितांविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने शिक्षेची सुनावणी केली. यात याकूब खान वगळता सर्व संशयितांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. शिक्षेत नमूद एकूण दंड वीस हजारांच्या रकमेतून पंधरा हजार रुपये पीडित विवाहितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

बऱ्याच वर्षांनी शिक्षा
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात भादवि कलम ४९८ (अ) अन्वये अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होतात. गुन्हे दाखल होऊन नंतर न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर काही ‘समेट’ घडवून आणतात, तर काही प्रकरणे आपापसांत मिटविली जातात. तडजोड झाली नाहीच तर खटला चालतो. साक्षीदारांची साक्ष, पुरावे गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसे ठरत नाहीत. परिणामी या कलमांत शिक्षेचे प्रमाण कमीच ठरते. न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात पाच जून २०१२ ला दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याचे कामकाज होऊन तपासाधिकारी उदयसिंग मोरे यांचा योग्य तपास, साक्षीदारांची अचूक साक्ष व पुराव्यांआधारे एक वगळता सर्व संशयितांविरुद्ध दोषारोप सिद्ध होऊन आज शिक्षा सुनावण्यात आली. बऱ्याच वर्षांनी अशा प्रकारच्या प्रकरणात शिक्षा झाल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.