जळगावात पोलिस मुख्यालयाच्या ‘गेम्स रूम’मध्येच तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नशेचे पान देऊन केला प्रकार; उपनिरीक्षक पित्यासह पोलिसाविरुद्ध गुन्हा

जळगाव - जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाच्या पोलिस मुलाने नशेचे पान खाऊ घालून चोवीसवर्षीय तरुणीवर पोलिस मुख्यालयाच्या गेम्स रूमसह कॅन्टीनमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक व पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारी घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनी फोन बंद करून पोबारा केला असून, पोलिस अधिकाऱ्यांचे पथक त्यांच्या मागावर आहे. 

शिवाजीनगर, चौगुले प्लॉट भागातील रहिवासी चोवीसवर्षीय तरुणीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मुख्यालयात कार्यरत परवेज रईस शेख या पोलिस कर्मचाऱ्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवत पाच वर्षांपूर्वी २०१२ मध्ये तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. परवेज याने पोलिस मुख्यालयातील गेम्स रूमसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील कॅन्टीनमध्ये वेळोवेळी अत्याचार केला. पीडित तरुणीने ही तक्रार थेट पोलिस अधीक्षकांकडे दिली.

चौकशीअंती गुन्हा दाखल
या तक्रारी अर्जावर अप्पर अधीक्षक बच्चन सिंग, उपविभगीाय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी केलेल्या चौकशीअंती बुधवारी (ता.२१) रात्री परवेज व वडील रईस शेख या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तरुणीची रीतसर फिर्याद घेऊन जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख करीत आहे.

गोळी घालण्याची धमकी
पीडितेच्या तक्रारीनुसार संशयिताचा पिता रईस शेख याने, पीडितेस एकांतात शिवीगाळ करत अश्‍लील बोलून तिचा विनयभंग केला तसेच मुख्य संशयित परवेजने याबाबत तक्रार करु नये यासाठी वेळोवेळी मारहाण करुन गोळी घालून ठार मारेल अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.

नशेचे मसाला पान देऊन अत्याचार
नशा आणणारे मसाला पान खाऊ घालून वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तपासाधिकारी श्रीमती देशमुख यांनी रात्री पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिच्या जबाबावरून दोघा पिता- पुत्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या पिता-पुत्रांचा तपास सुरू केला असून, दोघेही फरारी आहेत.