पासिंग न करताच कारची परस्पर विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

जळगाव - शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बुधवारी (२६ जुलै) एकाच क्रमांकाच्या दोन कार आढळून आल्या होत्या. मूळ मालकानेच बनावट क्रमांक असलेली कार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कारसह एकाला ताब्यात घेण्यात आले होते. यात कारचे हप्ते न भरणाऱ्या शेंदुर्णी येथील मूळ मालकाकडून सुंदरम फायनान्स कंपनीने कार ताब्यात घेतली व कारची विनाक्रमांकानेच पुढे परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. 

महाबळ येथील रहिवासी संदीप याज्ञिक यांना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच स्वत:च्या क्रमांकाची दुसरी कार आढळून आली होती. त्यांच्या तक्रारीनंतर जिल्हापेठ पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ‘अमेझ’ ही बनावट क्रमांकाची कार (एमएच १९, बीयू ५५३५) ताब्यात घेतली. निरीक्षक सुनील गायकवाड यांनी चौकशी केल्यावर शहरातील सुंदर फायनान्सकडून पतपुरवठ्यावर शेंदुर्णी येथील ऋषिकेश गोपाळराव गरुड यांनी २०१३ मध्ये ही कार घेतली होती. फायनान्सचे मासिक हप्ते फेडले नाही म्हणून ८ जून २०१५ रोजी सुंदरम फायनान्सने ही कार रीतसर रिकव्हर करून जप्त केली. 
जप्त ‘अमेझ’ कार २९ सप्टेंबर २०१५ ला स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विकली. तत्कालीन व्यवस्थापक निखिल गोडांबे यांनी हा सर्व व्यवहार केला.

त्यानंतर ‘अनरजिष्टर टायटल’ विनापासिंगची ही कार गणेश कॉलनीतील राजीव रामदास महाजन यांनी खरेदी केली. महाजन यांच्याकडून कार नरेंद्र विठ्ठल वारके (रा. रिंग रोड) यांच्याकडे आली. कारचे मूळ मालक ऋषिकेश गरुड, सुंदरम फायनान्सचा तत्कालीन व्यवस्थापक निखिल गोडांबे, शेवटचा खरेदीदार राजीव महाजन या तिघांना पोलिसांनी बोलावले असून त्यांचा जबाब आणि माहिती घेतल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. 

गरुडचा चॉइस नंबर
नरेंद्र वारके यांच्याकडून बनावट क्रमांकाची कार ताब्यात घेतल्यावर त्याने सुरवातीला राजकारणातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे घेतली. त्यानंतर पोलिसांशी वादही घातला. शेंदुर्णी येथील ऋषिकेश गरुड याने ‘५५३५’ हा चॉइस नंबर म्हणून बुक केला होता आणि तोच कारवर टाकल्याचे वारकेंचे म्हणणे होते.