पोलिसांना घाबरविण्यासाठी ‘त्याने’च फोडून घेतले डोके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

जळगाव - जिल्हा पोलिस दलातर्फे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला येत आहे. रेकॉर्डवर असलेल्या संशयितांवर चॅप्टर, हद्दपारी, एमपीडीए सारख्या कारवाया पोलिस दलातर्फे करण्यात येणार असून पोलिस ठाणेनिहाय अहवालावरून ही कारवाई करण्यात येत आहे. शहर पोलिस ठाण्याअंतर्गत आज सात संशयितांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करत असताना एकाने कारवाई करू नये म्हणून पोलिसांना घाबरवण्यासाठी स्वत:चे डोके खिडकीला मारून फोडून घेतल्याची घटना घडली. 

जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व ३४ पोलिस ठाण्याअंतर्गत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईचे टार्गेट ठरवून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातून किमान दोन हजारावर संशयित अट्टल गुन्हेगांवर कारवाई अपेक्षित आहे.

प्रत्येक उपविभागात डीवायएसपी या कारवाईसाठी प्रयत्नशील आहे. शहर पोलिस ठाण्यातर्फे रेकॉर्डवरील संशयितांचा शोध सुरू होता. आज सकाळीच सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यात रवींद्र ऊर्फ आबा दामू सोनवणे (वय-३२, रा. गेंदालाल मिल), सुनील रामा चोरट (वय-२६, रा. शिवाजीनगर), ललित अरुण चौधरी (वय ३१, रा. गेंदालाल मिल), फिरोज नुरमोहम्मद शहा (वय १९, गेंदालाल मिल), राजू साबीर खान (वय-२१), नईम तुकडू सय्यद (वय-२३) यांच्यासह अजीज रशीद पठाण (वय-२५, रा. गेंदालाल मिल) या सात संशयितांना निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक निरीक्षक एम. आय. जानकर, वासुदेव सोनवणे यांनी कारवाईसाठी ताब्यात घेतले होते. संशयितांवर मुंबई पोलिस अधिनियम कलम-१०७ अन्वये चॅप्टर केस भरण्यात येत असताना माझ्यावर कारवाई करू नका, असे म्हणत अजीज पठाण याने पोलिस ठाण्याच्या खिडकीला डोके आपटून घेत फोडून घेतले. पोलिसांनी तत्काळ थांबविले. त्यानंतरही त्याच्यावर नियोजित कारवाई झाली ती वेगळी.

कारवाई टाळण्यासाठी खोटा बनाव
रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे आरोपी पोलिसांनी अटक करू नये म्हणून वेगवेगळे फंडे अवलंबतात. अटक केल्यानंतर मारहाण होऊ नये, यासाठी नाटक करतात. पोलिसांना हे नवीन नाही. आता मात्र पोलिसांपेक्षा गुन्हेगारांना कायद्याची अधिक माहिती झाली आहे. पोलिसांनी अटक केल्यावर ते न्यायालयात हजर करतात. तेथे पोलिसांच्या मारहाणीची तक्रार केली तर पोलिस कोठडीऐवजी रुग्णालयात आराम करता येते. काही अट्टल गुन्हेगार आता मानवाधिकार आयोग आणि न्यायालयात तक्रारीची उघडपणे धमक्‍या देऊन कारवाई टाळण्यासाठी खोटा बनाव करू लागले आहेत. परिणामी एक गुन्हेगार सुटला तर चालेल पण कारवाईचे झेंगट आपल्यावर नको म्हणून तपासाधिकारीही आता कातडीबचाव धोरण अवलंबतात.