अट्टल गुन्हेगार सत्यासिंग बावरीला अटक

जळगाव - राजीव गांधी नगरातील चॉपरहल्ल्याप्रकरणी अट्‌टल गुन्हेगार सत्यासिंग बावरी यास शनिवारी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणताना.
जळगाव - राजीव गांधी नगरातील चॉपरहल्ल्याप्रकरणी अट्‌टल गुन्हेगार सत्यासिंग बावरी यास शनिवारी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणताना.

रविसिंगसह त्याच्या पत्नीचा शोध सुरू; परिसरात पोलिस बंदोबस्त कायम

जळगाव - येथील राजीव गांधी नगरात बुधवारी (१२ जुलै) रात्री पावणेअकराच्या सुमारास किरकोळ कारणातून वाद होऊन तरुणावर चॉपरहल्ला झाला होता. त्यात राहुल प्रल्हाद सकट (वय २५) याच्या पोटात चॉपर खुपसल्याने त्याच्या मूत्रपिंडाला गंभीर इजा झाली. त्यामुळे सलग तीन दिवस रुग्णालयात उपचारांनंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईला नेताना वाटेतच नाशिकजवळ राहुलचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आज या घटनेतील पळून गेलेल्या संशयित आरोपींच्या मागावर असलेल्या पोलिसांना मुख्य संशयीत सत्यासिंग मायासिंग बावरी मिळून आल्याने त्याला अटक केली. 

राजीव गांधी नगर परिसरात बुधवारी (१२ जुलै) रात्री राहुल सकट घराबाहेर हातगाडीवर जेवण करीत असताना सत्यासिंगने त्याला विनाकारण डोक्‍यावर टपली मारत दारूसाठी पैसे मागितले. त्यावरून किरकोळ वाद होऊन राहुल आपल्या घरात शिरला. त्यानंतरही सत्यासिंग, त्याचा भाऊ कर्तारसिंग, मालाबाई व कालीबाई बावरी आदी जण राहुलच्या घराजवळ येऊन वाद घालत होते. त्यातच संबंधित चौघांनी राहुलचा भाऊ अजय व आई म्हाळसाबाई यांना मारहाण करणे सुरू केले. मारहाणीत सत्यासिंगने लपवून आणलेला चॉपर राहुलच्या पोटात खुपसला. उजव्या बाजूने तो पोटात शिरल्यावर आतील मूत्रपिंडाला गंभीर इजा झाल्याने राहुलला रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर बनल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईला नेताना नाशिकजवळ राहुलचा मृत्यू झाला. या घटनेचा रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्हे शोध पथकाने त्यांचा तपास घेणे सुरू केले होते. पोलिस उपनिरीक्षक राजेश घोळवे, कर्मचारी प्रदीप चौधरी, शरद पाटील यांनी शोध घेऊन मुख्य संशयित सत्यासिंगला जळगाव रेल्वेस्थानकात ताब्यात घेऊन अटक केली. 

परिसरात बंदोबस्त कायम 
मृत राहुल गारूडी समुदायातील असून, मारेकरी सिकलगर आहे. राहुलच्या मृत्यूमुळे दोन्ही समुदायांत वाद चिघळला असून, गोंधळही उडाला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस निरीक्षक बापूसाहेब रोहम यांनी राजीव गांधी नगरात बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच गुन्ह्यातील संशयीत रविसिंग व त्याची पत्नी, आई व गुन्ह्यात सहभागी मलिंगसिंग यांचा पोलिस शोध घेत आहेत.  

दोनच परिवार असूनही दहशत
राजीव गांधी नगरात सिकलगर समुदायाचे केवळ दोन मोठे परिवार आहेत. त्यात भाऊबंद, नातेसंबंधातील इतरही काही वर्षांनंतर येथे वास्तव्यास आले. सुरा, विळा तयार करण्याचा मूळ व्यवसाय असलेल्या या संशयितांची परिसरात प्रचंड दहशत या भागात असून, कुटुंबातील महिला, लहान मुलेही वेळप्रसंगी सर्व प्रकारच्या गुन्ह्यात असतात. बाहेरच्या कुणाशी वाद झाल्यास सर्वच जण त्याच्यावर तुटून पडतात. 

खून, दरोड्यासह वीस गंभीर गुन्हे
सत्यासिंग बावरीच्या विरोधात गेल्या चार-पाच वर्षांत खून, तीन दरोडे, पोलिसांवर हल्ले, चार चोऱ्या-घरफोड्या, दोन दंगलीचे गुन्हे, दोन प्राणघातक हल्ले, असे एकूण वीस गंभीर गुन्हे दाखल असून, त्याला मागे हद्दपारही केले होते. त्याचा भाऊ रविसिंग याच्याविरुद्ध दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांवर दगडफेक 
शहरात घडणाऱ्या बहुसंख्य चोऱ्या, राजीव गांधी नगरातील महिला गॅंगमार्फत होत असल्याचे वारंवार निष्पन्न झाले आहे. त्यात सिकलगर समुदायातील जवळपास सर्वच तरुण चोऱ्या, घरफोड्यांच्या गुन्ह्यांत संशयीत असल्याने अटकेची कारवाईसाठी जाणाऱ्या पोलिस पथकावर दगडफेक करून पिटाळून लावल्याचे प्रकारही यापूर्वी या भागात घडले आहेत.

रेल्वेस्थानकात होता दबा धरून 
राहुल सकटला भोसकल्यानंतर सत्यासिंग व त्याचा भाऊ रविसिंग घटनास्थळापासून तत्काळ पसार झाले. सत्यासिंगने ओळख पटू नये म्हणून डोक्‍यावरील केस सोडून घेत उतारकरूप्रमाणे रेल्वेस्थानकातील वापरात नसलेल्या फलाटावर आसरा घेतला. गेले तीन दिवस तो पोलिसांच्या हालचाली टिपत असतानाच त्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली.

कालीबाई कारागृहात रवाना
चॉपरहल्ला प्रकरणात दोन दिवसांपूर्वी अटक केलेली सत्यासिंगची पत्नी कालीबाईला आज जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या. के. एस. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com