गांधी संकुलवासीयांचे आरोग्य धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

जळगाव - फुले व्यापारी संकुलानंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी व्यापारी संकुलात प्रचंड अस्वच्छता असल्याने गाळेधारकांसह ग्राहकांचेही आरोग्य धोक्‍यात आले आहे. संकुलात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, तिन्ही बाजूंनी अतिक्रमणाने वेढल्यामुळे संकुलाची रयाच गेली आहे.

जळगाव - फुले व्यापारी संकुलानंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी व्यापारी संकुलात प्रचंड अस्वच्छता असल्याने गाळेधारकांसह ग्राहकांचेही आरोग्य धोक्‍यात आले आहे. संकुलात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, तिन्ही बाजूंनी अतिक्रमणाने वेढल्यामुळे संकुलाची रयाच गेली आहे.

टॉवरपासून असोद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुले संकुलाच्या पुढे महात्मा गांधी संकुल वसलेले आहे. मोक्‍याच्या जागेवर चांगली रचना करत उभारलेल्या या संकुलाची अवस्था मात्र अत्यंत वाईट झाली आहे. संकुलात गाळ्यांची संख्या जरी जास्त नसली तरी कापड दुकानदार, लहान-मोठे व्यावसायिक आदींची दुकान-वस्ती आहे. छोटे-मोठे उद्योग, कलाकुसर करणारे व्यावसायिकही आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर शिवणकाम, विणकाम, सुतार, गृहोपयोगी साहित्य बनविणारे व्यावसायिक या संकुलात व्यवसाय करतात. 

संकुलाच्या आत गाळ्यांसमोर बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. संकुलाची शोभा वाढविण्यासाठी रोपे लावण्याच्या दृष्टीने संकुलामध्येच काही ठिकाणी बांधकाम करून चाऱ्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, त्याठिकाणी पाण्यासह कचरा साचलेला असल्याने रोगराईस निमंत्रण मिळत आहे. शहरातील अन्य महापालिका संकुलांप्रमाणेच या संकुलातही साफसफाईची कोणतीही यंत्रणा नाही. गाळेधारकांनीही तशी व्यवस्था केलेली नाही.

दर्शनी भागातील गाळेच सुस्थितीत
दोन मुख्य रस्त्यांच्या कॉर्नरवर हे संकुल आहे. दोन्ही रस्त्यांच्या दर्शनी भागात या संकुलात जे गाळे आहेत त्या गाळ्यांचाच परिसर फक्त ठीकठाक आहे. रस्त्याला लागून व दर्शनी भागात असल्याने हे गाळेधारकच आपापल्या गाळ्यासमोरील स्वच्छतेची काळजी घेत असतात. मात्र, संकुलाच्या आतील सर्व गाळ्यांची अवस्था बिकट आहे. 

अतिक्रमणाचाही वेढा
संकुलाला लागून असलेल्या असोदारोड व सुभाष चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण गेल्या सहा-आठ महिन्यांपासून सातत्याने काढले जात आहे. 

मात्र, महापालिकेची कारवाई झाली नाही की, फेरीवाले या रस्त्यावर संकुलाला पूर्णपणे वेढा देऊन गाड्या लावतात. अथक प्रयत्नांनी या फेरीवाल्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर केले, तरीही उपयोग झालेला नाही. शिवाय या दोन्ही रस्त्यांवर संकुलाला लागून बेशिस्त वाहनचालक व त्यातही मोठ्या प्रमाणात रिक्षाचालकांची गर्दी झालेली दिसते. त्यामुळे संकुलाला या दोन्ही बाजूंकडील अतिक्रमणाने वेढल्यामुळे संकुलाचा श्‍वास कोंडला आहे. अस्वच्छतेसह संकुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यांवरील हॉकर्स, रिक्षा व बेशिस्त वाहनचालकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्याची गरज आहे.