वेगवेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेखाली आल्याने तिघांचा मृत्यू

वेगवेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेखाली आल्याने तिघांचा मृत्यू

दोन मृतदेह नातेवाइकांकडे सोपविले; तिसऱ्याची ओळख पटविणे सुरू

जळगाव - तालुक्‍यात आज एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. मृतांत कांचननगरातील नरेश राजू बाविस्कर, हिरा-शिवा कॉलनीतील योगेश बोरसे व आणखी एकाचा यात समावेश असून, संबंधितांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यातील दोघांची ओळख पटल्याने मृतदेहांचे विच्छेदन करून ते नातेवाइकांकडे सोपविले असून, तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे सुरू आहे.  

कांचननगरमधील रहिवासी व अंगणवाडी सेविकेचा अठरावर्षीय मुलगा नरेश बाविस्कर प्रजापतनगरासमोरील रेल्वेरूळावर सकाळी मृतावस्थेत आढळून आला. मोठा भाऊ व काकांनी त्याला घटनास्थळी ओळखले. दुसऱ्या घटनेत हिरा-शिवा कॉलनीतील रहिवासी योगेश बोरसे मुंबईकडे कामानिमित्ताने जाताना धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या घटनेत शिरसोली ते जळगाव दरम्यान रेल्वेरूळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 

अंगणवाडी सेविकेच्या मृलाचा मृत्यू
कांचननगरातील नरेश बाविस्कर याचा प्रजापतनगरातील डाऊन रेल्वेमार्गावरील खांब क्र. ४२१/१) ते(४२१/३३ दरम्यान आज सकाळी मृतदेह आढळून आला. यासंदर्भात माहिती मिळताच कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी रेल्वेरूळाकडे धाव घेतली. नरेश हा आई रंजनाबाई, मोठा भाऊ उमेश यांच्यासमवेत वास्तव्यास होता. शिक्षणासोबतच एका काचेच्या दुकानात तो काम करायचा. काल रात्री साडेआठला नरेश मित्रांसमवेत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री चित्रपट सुटल्यानंतर बाराच्या सुमारास घरी परतला व लागलीच पुन्हा गल्लीतील मित्रांसमवेत गप्पा मारण्यासाठी निघून गेला. नरेश रात्री दीडपर्यंत मित्रांसमवेत कट्ट्यावर बसून होता. दरम्यान, सकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांना विचारपूस केली असता रात्री दीडला तो एकटा प्रजापतनगरातील घराकडे जात असल्याचे दिसून आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

त्यानंतर मोठा भाऊ उमेश व काका यांनी नरेशचा शोध घेण्यास सुरवात केली असता नरेश प्रजापतनगराजवळील रेल्वेरूळावर मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेरूळावर मृतदेह पाहताच काकांसह मोठ्या भावाने हंबरडा फोडला. नरेशला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी उपस्टेशन प्रबंधक एस. बी. सनस यांच्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

नरेशचा मृत्यू की घातपात?
चित्रपट पाहून परतल्यावर रात्री उशिरापर्यंत मित्रांसमवेत गप्पांत रमल्यानंतर तो प्रजापतनगरातील घराकडे निघून गेला. कुटुबात नरेश सर्वांचा लाडका होता. त्याच्यामागे आई, मोठा भाऊ, विवाहित बहीण आहेत. नरेशच्या जन्मापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. कुणाशीही कसला वाद नाही. हसत-खेळत तो घरातून गेला. त्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे सांगत त्यांच्या नातेवाइकांनी आत्महत्येची शक्‍यता फेटाळून लावली. 

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
शिरसोली-जळगाव रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडून ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील हिरा-शिवा कॉलनीतील रहिवासी योगेश बळिराम बोरसे याचा रेल्वेरूळावर मृतदेह आढळून आला. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश कुटुंबीयांसोबत राहतो. काल मध्यरात्री मुंबईला काही कामानिमित्त जाताना शिरासोली रेल्वेमार्गावरील खांबा क्र.  ४१७/२३ ते (४१७/२५ दरम्यान त्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी रेल्वेरूळावर मृतदेह आढळून आल्यावर घटना उघडकीस आली. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केल्यावर हिरा-शिवाकॉलनीतील योगेश बोरसेचा मृतदेह असल्याचे समोर आले. यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात उपस्टेशन प्रबंधक ए. बी. सणस यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक संभाजी पाटील तपास करीत आहेत. 

अनोळखी मृतदेह आढळला
तिसऱ्या घटनेत शिरसोली रेल्वेमार्गावर आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मध्य रेल्वेच्या शिरसोली-जळगाव रेल्वेमार्गावरील खांब क्र. ४१५/२० ते  ४१५/२२ दरम्यान आज सकाळी अनोळखी व्यक्ती रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. या ठिकाणी पोलिसांना मृतदेह आढळून आला असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी उपस्टेशन प्रबंधक डी. टी. तायडे यांनी पोलिसांत खबर दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com