विजेच्या धक्‍क्‍याने डॉक्‍टरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

जळगाव - डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणारे डॉ. प्रशांत संजय राठोड यांचा वसतिगृहाच्या खोलीत कपडे वाळत घालताना त्यांचा कुलरला स्पर्श झाला आणि विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. 28) रात्री ही घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील डॉ. प्रशांत राठोड (वय 27) यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. पदवी घेतल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून डॉ. प्रशांत याच महाविद्यालयात इंटर्नशिप करीत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. प्रशांत यांचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक सोमवारी सकाळी महाविद्यालयात पोचले.

दरम्यान, महाविद्यालयातील वसतिगृहाचे इलेक्‍ट्रिक फिटिंग खराब झाल्याची तक्रार डॉ. प्रशांत यांनी वर्षभरापूर्वी प्रशासनाकडे केली होती. मात्र, या तक्रारीची कुठलीच दखल घेतली गेली नाही. महाविद्यालयाने वेळीच त्याची दखल घेतली असती, तर डॉ. प्रशांत यांचा मृत्यू झाला नसता, असा आरोप त्यांचे वडील संजय राठोड यांनी केला आहे. त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, रजिस्ट्रार आणि अधिष्ठाता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.