हरिविठ्ठलनगरात घराला आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

जळगाव - हरिविठ्ठलनगरात आज सकाळी दहाच्या सुमारास पार्टिशनच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळून खाक झाली. महापालिका अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आग विझविण्यात आली. 

जळगाव - हरिविठ्ठलनगरात आज सकाळी दहाच्या सुमारास पार्टिशनच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळून खाक झाली. महापालिका अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आग विझविण्यात आली. 

हरिविठ्ठलनगरातील मिश्रीलाल राठोड गवंडी काम करतात. पाच महिन्यांपासून संजय सपके  यांच्या घरात ते भाड्याने पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. मिश्रीलाल व त्यांची पत्नी आज सकाळी दहाला कामावर गेले, तर मुले शाळेत गेली होती. त्यानंतर घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. लाकडी पाट्यांच्या घराला पत्रे असल्याने मोकळ्या फटीतून धूर बाहेर येत होता. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. घराला लावलेल्या पाट्यांनी पेट घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरमालक संजय सपके यांनी अग्निशमन दलाला दूरध्वनी करून बंब मागविला. तोपर्यंत नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. बंब आल्यानंतर आग विझविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिश्रीलाल व त्यांची पत्नीही तत्काळ घरी आले. आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाल्याने राठोड दाम्पत्याने आक्रोश केला. आगीत कपडे, धान्य, प्लास्टिक तसेच फायबरचे भांडे व साडेचारशे रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.