फाइल सापडली नाही, तर गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जळगाव - ममुराबाद रस्त्याच्या कडेला असलेल्या लेंडी नाल्याचा मूळ प्रवाह बदलल्याच्या तक्रारीनंतर, नाल्याच्या संबंधित नकाशाची फाइलच महापालिकेतून गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. ही फाइल शोधण्यासाठी ‘नगररचना’तील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या; परंतु आठ दिवस उलटूनही फाइल सापडली नाही. त्यामुळे आता दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, फाइल न सापडल्यास गुन्हा दाखल करा, अशा सूचना आयुक्तांनी सहाय्यक नगररचनाकारांना दिल्या आहेत.

शहरातील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्‍चर व विजयकुमार जैन व्हेंचर ग्रुप यांनी बांधकाम करण्यासाठी ममुराबाद रस्त्याच्या कडेला असलेल्या लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याची तक्रार आयुक्त जीवन सोनवणे यांना प्राप्त झाली होती. त्यावरून तक्रारदार, आयुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी व अभियंत्यांनी नाल्याची पाहणी करून गाव नकाशावरून लेंडी नाला योग्य असल्याचा अहवाल आयुक्तांना दिला होता. फाइल गहाळ झाल्यानंतर नगररचनाकार बागूल यांनी तत्काळ संबंधित अभियंता विजय मराठे, शिपाई संजीव खडके, रेकॉर्ड किपर नामदेव पोळ यांना तीन दिवसांत फाइल शोधण्याचे आदेश दिले होते. पुन्हा मुदतवाढ करून फाइल शोधण्याची संधी दिली. आठवड्यानंतरही फाइल सापडली नाही. आता शुक्रवारपर्यंत फाइल सापडली नाही, तर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयुक्त सोनवणे यांनी सहाय्यक नगररचनाकार फडणीस यांना आज दिल्या.

एलबीटी, लेखापरीक्षण तक्रारीचा खुलासा मागविला
आयुक्त जीवन सोनवणे यांनी एलबीटी, तसेच लेखापरीक्षणाच्या आलेल्या तक्रारीवरून नगररचना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून आज खुलासा प्राप्त न झाल्यास उद्यापर्यंत (२२ जून) खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.