दोन कारमधून बॅगांसह मोबाईल लंपास

दोन कारमधून बॅगांसह मोबाईल लंपास

जळगाव - येथील नवी पेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळ उभ्या दोन वेगवेगळ्या कारमधून चोरट्यांनी दार उघडून आतील बॅगा लांबविल्या. ही घटना आज दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. यात एका बॅगेतून रोख दहा हजार, तर दुसरीतून पाच हजार, तसेच बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला गेला. यासंदर्भात संबंधितांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, शहर पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. 

भुसावळ येथील शांतीनगर भागातील पुखराज पार्कमधील रहिवासी उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे (वय ३२) ठेकेदारी व्यवसाय करतात.

जळगावमधील विजया बॅंकेत काम असल्याने ते आज दुपारी इन्होव्हा कारने (एमएच १९- सीपी ००९१) शहरात आले होते. त्यानंतर नवी पेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळ त्यांनी कार उभी करून विजया बॅंकेत गेले. कारचा दरवाजा ‘लॉक’ केला नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कारचे दार उघडून दहा हजार रुपये ठेवलेली बॅग नेली. त्यानंतर दुपारी सव्वाच्या सुमारास श्री. बोरसे काम आटोपून कारजवळ आले असता त्यांना कारमधील बॅग गायब असल्याचे आढळले. कारमध्ये शोध घेतला असता बॅग चोरीस गेल्याची त्यांची खात्री झाली. बॅग कुठे गेली? तर चोरीस गेल्याची चर्चा होऊन त्यांच्याच कारशेजारी उभ्या असलेल्या अमित सुंदरलाल सेवानी (वय ३५, रा. अमरावती) यांच्या स्विफ्ट डिझायर कारमधूनही (एमएच २७- एआर ८०१७) चोरट्यांनी पाच हजार रुपये ठेवलेली बॅग व बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविल्याचे आढळून आले. यानंतर घटनास्थळावरून दोन्ही कारमालकांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार सांगितला. श्री. बोरसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे
टॉवर चौकातील प्रभात सोडा हे दुकान शहर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. चौकात एकावेळी तीन वाहतूक पोलिस, दोन वॉर्डन बॉय तैनातीला असतात. तरीही चोरटे अशाप्रकारे हिंमत करीत असतील, तर पोलिसांच्या असण्या आणि नसण्याचा कुठलाही उपयोग नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

सीसीटीव्ही फुटेजची धुंडाळणी
घटना समोर आल्यावर पोलिसांनी या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत फुटेज संकलनाचे काम सुरू होते.

पायी गस्त कागदावरच?
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर असलेल्या शहर पोलिस ठाण्यानजीकच चोरट्यांनी एकापाठोपाठ एक दोन कारची दारे उघडून रोकड व मोबाईल लंपास केला. पोलिस ठाण्यातून बीट मार्शल ड्यूटीवर कर्मचाऱ्यांच्या दोन जोड्या सतत गस्तीवर असतात. दिवसाच चोरटे हातसफाई करीत असतील, तर गस्तीबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com