‘राष्ट्रवादी’, ‘खाविआ’ संयुक्तपणे लढणार महापालिका निवडणूक

‘राष्ट्रवादी’, ‘खाविआ’ संयुक्तपणे लढणार महापालिका निवडणूक

डॉ. सतीश पाटील : महिला-बालकल्याण सभापतिपदासह स्थायी समितीचे सदस्यपद देण्याचे सुरेशदादांचे आश्‍वासन
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसने खानदेश विकास आघाडीला चार वर्षे साथ दिली आहे. यापुढेही ती कायम ठेवण्यात येईल. आगामी महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढण्यात येईल, असा प्राथमिक स्तरावर निर्णय झाला आहे. खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्याशी आज चर्चा झाली आहे. लवकरच मुंबई येथे शरद पवार किंवा अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

श्री. जैन यांनी सद्यःस्थितीत महापालिकेत महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद व स्थायी समितीत एक सदस्यपद ‘राष्ट्रवादी’ला देण्याचा निर्णयही जाहीर केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. महापालिकेत सत्ताधारी खानदेश विकास आघाडीला राष्ट्रवादी काँगेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. याच पाठिंब्यावर खानदेश विकास आघाडीचा महापौर आहे. शेवटच्या वर्षात ‘मनसे’ने महापौरपदाची मागणी केल्यानंतर खानदेश विकास आघाडीचे नेते जैन यांनी ती मागणी मान्य केली. त्यानुसार ‘मनसे’चे ललित कोल्हे महापौर झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही आज शिवाजीनगरातील सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि शेवटच्या वर्षात उपमहापौरपद द्यावे, अशी मागणी केली.

जैन- डॉ. पाटील यांची चर्चा
नगरसेवकांनी भेट घेतल्यानंतर जैन यांनी भ्रमणध्वनीवर आमदार डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. याबाबत डॉ. पाटील म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून खानदेश विकास आघाडीने सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. ‘मनसे’ला महापौरपद दिले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौरपद देण्याची मागणी केली. त्यावर जैन यांनी सांगितले, की उपमहापौरपद आघाडीच्या नगरसेवकांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हे पद देता येणार नाही; परंतु महिला व बालकल्याण समिती सभापतिपद व स्थायी समितीचे एक सदस्यपद देण्यात येईल.

संयुक्तपणे निवडणूक लढविणार
जैन यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत डॉ. पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की महापालिकेत सध्याच्या सत्तेतील भागीदारीसोबत आगामी महापालिका निवडणूकही सोबतच लढविण्याचे जैन यांनी सांगितले आहे. चार वर्षे तुम्ही साथ दिली. आता यापुढेही ती कायम ठेवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानुसार आमचीही खानदेश विकास आघाडीसोबतच निवडणूक लढविण्याची तयारी आहे. त्याबाबत प्राथमिक स्तरावर खानदेश विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाचे नेते शरद पवार किंवा अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल. यावेळी खानदेश विकास आघाडीचे गटनेते रमेश जैन, नगरसेवक अमर जैन आदी उपस्थित होते.

सर्वानुमते नाव ठरविणार - सुरेश सोनवणे
महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, की महापालिकेतील पक्षाचे काही नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. चार वर्षे त्यांना महापालिकेत साथ दिल्याने यावर्षी पक्षाला उपमहापौरपद मिळावे, अशी मागणी केली. आमचे नेते जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील व सुरेशदादा जैन यांची मोबाईलवरून चर्चा झाली. मात्र, उपमहापौरपद आघाडीतील नगरसेवकांना जाहीर झाल्याने पक्षाला महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद व स्थायी समितीचे सदस्यपद देण्याचे निश्‍चित झाले आहे. पक्षाचे कार्यकर्ते मिळून आम्ही बैठक घेऊन सभापतिपदासाठी नाव लवकरच निश्‍चित करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com