‘गोलाणी’तील ३२५ गाळेधारकांना महापालिकेतर्फे उद्यापर्यंतची मुदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्वच्छतेसाठीची रक्कम न भरल्यास होणार गाळे ‘सील’

जळगाव - जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी महिनाभरापूर्वी गोलाणी व्यापारी संकुलातील स्वच्छतेची पाहणी करून अस्वच्छतेसंदर्भात संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यानंतर गाळेधारकांनी आयुक्तांना भेटून स्वच्छतेची जबाबदारी घेऊन तीन महिन्यांच्या स्वच्छतेसाठी अकराशे रुपये देण्याचे कबूल केले. परंतु अद्याप तब्बल ३२५ गाळेधारकांनी पैसे भरले नसल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारपर्यंत (२१ ऑगस्ट) महापालिका या गाळेधारकांना मुदत देणार असून, तरीही संबंधितांनी पैसे न भरल्यास गाळे ‘सील’ केले जाणार आहेत. 
गोलाणी व्यापारी संकुल स्वच्छतेची जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त निंबाळकर तसेच प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी पाहणी केली होती.

त्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आल्याने गोलाणी व्यापारी संकुल बंदची नोटीस बजावली होती. सर्व गाळेधारकांनी आयुक्तांची भेट घेऊन स्वच्छतेची जबाबदारी घेऊन अकराशे रुपये स्वच्छतेचे देण्याचेही कबूल केले होते. त्यानुसार संकुलातील एक हजार ६१ पैकी ७४१ गाळेधारकांनी पैसे दिले, तर ३२५ गाळेधारकांनी अजूनही पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे आता महापालिकेने गाळेधारकांना सोमवारपर्यंत (२१ ऑगस्ट) शेवटची मुदत दिली आहे. 

आठ लाख रुपये जमा
गोलाणी व्यापारी संकुलातील ७४१ गाळेधारकांकडून प्रत्येकी अकराशे रुपये स्वच्छतेसाठी घेतले आहेत. त्यानुसार आठ लाख तीन हजार रुपये आतापर्यंत जमा झाले असून, आणखी ३२५ गाळेधारकांकडून पैसे येणे बाकी आहे.

दुकानांपुढे पुन्हा कचरा
गोलाणी व्यापारी संकुलात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार संकुल पूर्णपणे स्वच्छ करून गाळेधारकांना डस्बीनमध्ये कचरा टाकण्याचे व दुकानाबाहेर डस्बीन ठेवण्याची सूचना दिली होती. परंतु काही गाळ्यांबाहेर पुन्हा कचरा पडलेला दिसत असल्याने कचरा फेकणाऱ्यांवर आरोग्य विभागाने कारवाई करणे आवश्‍यक आहे.