नावेदच्या हत्येच्या धक्‍क्‍याने पिरजादेवाडा सुन्न; चार बहिणींचा लाडक्‍या ‘छोट्या’साठी आक्रोश

नावेदच्या हत्येच्या धक्‍क्‍याने पिरजादेवाडा सुन्न; चार बहिणींचा लाडक्‍या ‘छोट्या’साठी आक्रोश

जळगाव - शहरातील मेहरुण परिसरातील पिरजादे वाड्यातील अठरावर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सकाळी अकराला मेहरुण परिसरात धडकली. तरुणाची ओळख पटल्यावर त्याच्या कुटुंबीयांना बोलावून खात्री करण्यात आली. वडील शकिबुद्दीन पिरजादे यांनी मुलास ओळखले. दुपारी तीनला नावेद ऊर्फ छोट्याचा मृतदेह मेहरुण परिसरात आणण्यात आल्यावर परिसरातील रहिवासी तरुणांची तोबा गर्दी उसळली होती. रमजान ईदची तयारीला वेग आला असतानाच दारावर रोजेदार तरुण मुलाचा मृतदेह धडकल्याने आई-वडिलांसह तीन भाऊ व चार बहिणींचा आक्रोश बघूनच पिरजादेवाडा सुन्न झाला होता. 

मुस्लीम बांधवांचा एकमेव मोठा सण रमजान ईदला अवघे ९ दिवस शिल्लक आहे, तत्पूर्वी जो- तो आपापल्या ऐपतीप्रमाणे तयारीला लागला आहे.

मेहरुणच्या पिरजादे वाड्यातील हात मजूर शकिबुद्दीन तमिजऊद्दीन पिरजादे यांचे कुटुंबीय सुद्धा तयारीत मग्न होते. कुटुंबात मोठा मुलगा जियाऊद्दीन हा खासगी वाहनाने सकाळीच पुण्याहून परतला, नजीबुल हक, जुनेद हे काम करून शिक्षण घेत आहे, त्याच्यासह या कुटुंबात नावेदची आई शरीफबानो, बहीण शबाना परवीन, शबीना, शाहीना, शबनम अशा सर्वांचेच रोजे येत असल्याने सर्वांनाच दहा दिवसांनी येणाऱ्या ईदच्या प्रतिक्षेसह उत्साह कायम होता. काल नेहमी प्रमाणे रोजा इफ्तार झाल्यावर साडे आठ वाजेपर्यंत नावेद फातिमा मशीद आवारातच होता. मित्र समीर व फिरोज यांना तो शेवटचा भेटल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर मात्र थेट त्याच्या मृत्यूची बातमी कळाल्याने आम्हालाही आश्‍चर्य असल्याचेही दोघां मित्रांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयातून साडेतीनच्या सुमारास नावेदचा मृतदेह मेहरुण मध्ये आणण्यात आला. 

मृतदेहाला धार्मिक विधी नुसार ‘घूस्ल’ दिल्यावर पिरजादेवाड्यात नेण्यात आले. मृताचा केवळ चेहराच दाखवण्यात आला. हसत खेळतच घरातून निघालेल्या भावाचा थेट ‘जनाजा’ दरावर आल्याने त्याची आई व चौघा बहिणींचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

वाडा सुन्न, कारण समजेना!
मेहरुण भागातील पिरजादे वाड्यात नावेद अख्तरचा मृतदेह आणल्यावर त्याला बघण्यासाठी शहरातील विविध परिसरातील तरुणांसह वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, कुटुंबीयांशी संबंधित नागरिक, नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाला केवळ नावेदच्या मृत्यूचे कारण जाणून घ्यायचे होते. मात्र त्याला का? व कोणी मारले? हेच माहिती नव्हते. सर्वच प्रश्‍नार्थक चेहऱ्याने एकमेकांकडे बघत होते. तर कुटुंबीय नातेवाईक एकमेकांना शांत करीत सांत्वन करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com