ओक मंगल कार्यालयात अग्नितांडव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

जळगाव - बळिरामपेठेतील ओक मंगल कार्यालयाच्या खोलीला आग लागल्याची घटना रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गल्लीतील तरुणांनी वाढदिवसानिमित्त फटाके फोडल्याने ही आग लागल्याचा संशय असून, आगीत  सुमारे २० ते २५ हजारांच्या लाकडी साहित्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव - बळिरामपेठेतील ओक मंगल कार्यालयाच्या खोलीला आग लागल्याची घटना रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गल्लीतील तरुणांनी वाढदिवसानिमित्त फटाके फोडल्याने ही आग लागल्याचा संशय असून, आगीत  सुमारे २० ते २५ हजारांच्या लाकडी साहित्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बळिरामपेठेत नितीन ओक यांच्या मालकीचे ओक बहुद्देशीय सभागृह (मल्टिपर्पज हॉल) आहे. शेजारीच गल्लीत वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने काही तरुणांनी या ठिकाणी फटाके फोडले. फटक्‍याची ठिणगी मंगल कार्यालयात उडाल्याने गुदामातील जुन्या लाकडी साहित्याने पेट घेतला. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांत धावपळ उडाली. आरडाओरड होऊन नगरसेवक जितू मुंदडा यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन करून बंब मागवले. परिसरातील तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळावर प्रचंड गर्दी झाली होती. शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. 

४० मिनिटांनंतर आग आटोक्‍यात
ओक मल्टिपर्पज हॉलचे मालक नितीन ओक यांनी गल्लीत काही तरुण फटाके फोडत असल्यानेच आग लागली असल्याचे सांगितले. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, ४० मिनिटांनी आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आगीत जुन्या बनावटीचे लाकडी साहित्य, दारांच्या चौकटी असे ३० हजारापर्यंतचे साहित्य जळून नुकसान झाल्याचे नितीन ओक यांनी सांगितले.

पोलनपेठ भागात दुकानाला आग
सुभाष चौकातील पोलनपेठेत एका अगरबत्ती दुकानाला बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. दुकानातील वीजजोडणीत शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज असून, दुकानातील दोन ते तीन लाखांचा माल पूर्णत: जळून नष्ट झाला आहे. महापालिका अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. मुख्य बाजारपेठेत उसळलेल्या बघ्यांच्या गर्दीने मदतकार्याला अडचणी येत असल्याचे दिसून आले. 

पोलनपेठेत सुरेंद्र रोशनलाल नाथाणी यांच्या मालकीचे रोशन अगरबत्ती एजन्सी आहे. खाली अगरबत्तीचे दुकान आणि वरच्या मजल्यावर डॉ. एम. एस. राव यांचा दवाखाना आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक दुकानाच्या मागील भागातून धूर निघताना कामगारांना व मालकांना दिसले. मागे जावून बघितल्यावर आगीच्या लोटामुळे धूर निघत असल्याचे दिसून आल्याने त्यांची धांदल उडाली. नाथाणी यांच्या दुकानातील नोकर व शेजारी दुकानदार, हमालांनी धाव घेत पाण्याचा मारा केला. मात्र आग आटोक्‍याबाहेर असल्याने अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले.

माल वाचविण्याची धडपड
नाथाणी यांच्या दुकानात अगरबत्तीसह इतर मालाचा साठा असल्याने नोकरांनी माल वाचवण्यासाठी धडपड चालवली होती. अगरबत्ती भरलेले पेट्या व बॉक्‍स बाहेर काढण्यासाठी धावपळ करत होते. मदतीसाठी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, वासुदेव सोनवणे यांच्यासह शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर मदतीसाठी पोचले होते. दरम्यान, आगीमुळे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज सुरेंद्र नाथाणी यांनी वर्तविला असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असेही प्रथमदर्शनी आढळून आले.