घरबसल्या इंटरनेट, मोबाईलद्वारे तक्रारींची सुविधा

घरबसल्या इंटरनेट, मोबाईलद्वारे तक्रारींची सुविधा

पोलिसांचे ‘सिटिझन पोर्टल’ कार्यान्वित; अर्जांचा पाठपुरावा करणे आता सोपे

जळगाव - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र पोलिस दलाने अधिकाधिक लोकाभिमुख सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणजे पोलिस दलातर्फे इंटरनेट, मोबाईलद्वारे अत्यावश्‍यक सेवा पुरविण्यासाठी ‘सिटिझन पोर्टल’ सुरू करण्यात आले असून, वेबसाइटद्वारे नागरिकांना याचा वापर करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना आज पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांना सिटिझन पोर्टलचा लाभ घेता येणार आहे. www.mhpolice.maharastra.gov.in संकेत स्थळावर नागरिकांनी संपर्क केल्यास त्यांना ‘सिटीझन पोर्टल’चा उपयोग करता येईल. या पोर्टलद्वारे ई-तक्रार नोंदणी, ई-तक्रारीची सद्य:स्थिती पाहणे, भाडेकरु, पेइंग गेस्टची माहिती, घरगुती नोकरांचे चारित्र्य पडताळणी, इव्हेंट, परफॉर्मन्स विनंती, निवेदन, संप विनंती, मिरवणूक विनंती, सी-फॉर्म, वाहन चौकशी, वाहन चोरीची तक्रार, हरवल्याबाबतच्या तक्रारी सहजगत्या या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहेत. ज्या किरकोळ कामांसाठी वारंवार पोलिस ठाण्यांत फेऱ्या माराव्या लागतात ते काम आता सोपे होणार आहे. 

नोंदणी केल्यानंतर...
‘सिटिझन पोर्टल’वर लॉग-इन करून आपला मोबाईलनंबर, नाव, ई-मेल लोड केल्यावर शहरातील आणि जिल्ह्यातील कुठल्याही पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांबाबत माहिती घरबसल्या मिळू शकेल. त्यात एफआयआरची प्रत, खबरी अहवाल, अटक संशयितांची माहिती, हरविलेल्या व्यक्तीची माहिती, अनोळखी मृतदेह, फरारी संशयिताची माहिती, महाराष्ट्र पोलिस आवेदन अर्ज डाऊन लोड, गुन्ह्यांची सांख्यिकी माहिती, गहाळ झालेले मोबाईल आदींची माहिती उपलब्ध होऊन आवश्‍यकतेनुसार कमीत कमी वेळेत काम करता येणार आहे.  

गोपनीयता कायम 
‘सिटिझन पोर्टल’च्या माध्यमातून दाखल गुन्हे, गुन्हेगारांचे स्टेट्‌स आणि इतर सर्व कामकाज बघता येण्यासारखे असले तरी, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडितांशी संबंधित दाखल गुन्हे (ज्यात नाव आणि ओळख उघड होईल) कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरेल, अशी माहिती गोपनीय राहील. 

कार्यशाळेत निर्देश 
जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील सर्व आठ विभागातील डीवायएसपी, सीसीटीएनएस यंत्रणेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना ‘सिटिझन पोर्टल’बाबत प्रशिक्षण आणि उपयोगितेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अप्पर अधीक्षक बच्चनसिंग, प्रशांत बच्छाव, श्री. नीलोत्पल, डीवायएसपी सचिन सांगळे, केशव पातोंड, सदाशिव वाघमारे, रशीद तडवी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेशसिंह चंदेल आदींसह ‘सीसीटीएनएस’चे कर्मचारी उपस्थित होते.

‘सिटिझन पोर्टल’ कार्यान्वित झाल्याने पारदर्शकपणे पोलिस दलातील कामे होतील. गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामांसाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. अधिकाधिक जनतेने याचा वापर केल्यास पोलिस दलाच्या कामांत सुसूत्रता येऊन अधिक चांगले काम करण्यासाठी पोलिस तत्पर राहतील. 
- बच्चनसिंग, अप्पर पोलिस अधीक्षक, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com