तोतया उपजिल्हाधिकाऱ्याची वाढविली पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

शाळेला भेट दिलेली साऊंड सिस्टिम, नेमप्लेट केली जप्त

जळगाव - तोतया उपजिल्हाधिकारी समाधान जगताप याच्या घराच्या झडतीतून मिळालेले साहित्य, नेमप्लेट व त्याने एका शाळेला भेट दिलेली साऊंडसिस्टिम पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्या. कुलकर्णी यांनी उद्यापर्यंत (ता. २५) त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. 

तोतया उपजिल्हाधिकारी जगताप याने शिर्डी व सप्तश्रृंगी गडावर आपण तहसीलदार सांगून व्हीआयपी दर्शन घेतल्याचे तसेच स्वतःच्या घरावर तहसीलदार म्हणून नेमप्लेट लावल्याची माहिती समोर आली होती. एवढेच नव्हे तर या भामट्याने तहसीलदार म्हणून एका शाळेला भेट दिल्याचेही समोर आले होते. जगताप याने चौगाव (ता. बागलाण) येथे एका शाळेला साऊंडसिस्टिम भेट दिली होती. त्यावर तो तहसीलदार असल्याचे लिहिण्यात आले होते. 

संबंधित साऊंडसिस्टिम पोलिसांनी जप्त करीत शाळेतील शिक्षकांचे जबाब घेतले. तसेच नाशिक येथील घरावर त्याने तहसीलदार म्हणून लावलेली नेमप्लेट व पोस्टर जप्त करण्यात आले आहे. अमळनेर येथील शासकीय विश्रामगृहावरही तो अधिकारी म्हणून थांबल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या ताब्यातून मिळालेल्या पेनड्राईव्हमधून आवश्‍यक बाबी मिळाल्या असून, त्याचे ११ एटीएम-डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. 

त्या आधारे आर्थिक व्यवहार झाले काय, याचा तपास डीवायएसपी सांगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक गजानन राठोड हे करीत आहेत. जगतापला आज न्यायालयाने एक दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.