आजारी दांपत्याची कर्जमाफीच्या अर्जासाठी वणवण

जळगाव - शहरातील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयात कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जाबाबत आपली तक्रार करण्यासाठी आलेले नांद्रा बुद्रुक (जि. जळगाव) येथील शेतकरी यशवंत पाटील आणि मनकर्णिका पाटील.
जळगाव - शहरातील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयात कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जाबाबत आपली तक्रार करण्यासाठी आलेले नांद्रा बुद्रुक (जि. जळगाव) येथील शेतकरी यशवंत पाटील आणि मनकर्णिका पाटील.

जळगाव - वय वर्षे ७२...दुर्धर आजाराने ग्रस्त...पत्नीदेखील हृदयविकाराच्या रुग्ण...अशा स्थितीत नांद्रा बुद्रुक (ता.जळगाव) येथील यशवंत त्र्यंबक पाटील यांना कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावातील सोसायटी...सोसायटीतून जिल्हा उपनिबंधक कार्यालय...अशा चकरा ते मारीत आहेत...अधिकारी भेटतात, पण समाधानकारक उत्तर मिळत नाही. मात्र, एवढी वणवण करूनही कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज दाखल होत नाही, हे कापऱ्या आवाजात सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. 

यशवंत पाटील हे पत्नी मनकर्णिका पाटील यांच्यासोबत बुधवारी (ता. २३) सायंकाळी जळगाव शहरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले होते. त्यांचा ऑनलाइन अर्ज दाखल करताना आधार क्रमांक नमूद होत नसल्याने अर्ज दाखल झालेला नाही. यासंबंधी या कार्यालयात समस्या मांडून परत जात असताना ‘ॲग्रोवन’कडे त्यांनी आपली व्यथा मांडली.

यशवंत पाटील यांच्याकडे नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथे चार एकर शेती आहे. 

वृद्धापकाळामुळे ते आता घरी असतात. त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबई येथे रिक्षा चालवतो. त्यांनी या वयातही शेती करण्याचा ध्यास सोडलेला नाही. मात्र, बेभरवशाचा पाऊस शेतीला साथ देत नाही. एखाद वर्ष चांगल गेलं की दुसरं मुळावर उठतं. त्यांनी २०११ मध्ये गावातील विविध कार्यकाही सहकारी सोसायटीमधून ६५ हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, सततच्या आजारपणामुळे त्यांना ते भरता आले नाही. आता कर्जमाफी योजनेत लाभ मिळेल यासाठी ते बारडोली येथून नांद्रा बुद्रुक येथे या आठवड्यात पत्नीसह दाखल झाले. 

आधार क्रमांक गुजराथी
ते कर्जमाफीचा अर्ज भरण्यासंबंधी गावातील डिजिटल केंद्रात गेले. त्यांचे आधार कार्ड हे गुजरातमधील बारडोलीचे आहे. त्यामुळे क्रमांक ऑनलाइन अर्जात नमूद होत नाही, असे संबंधित संगणक परिचालकाने सांगितले. पुढे काय करायचे असे गावातील सोसायटीत विचारले असता, त्यांनी डीडीआर (जिल्हा उपनिबंधक) कार्यालयात जा.. सांगितले आणि पाटील हे पत्नीसह या कार्यालयात आले. 

कार्यालय रिकामे रिकामे
पाटील यांची समस्या जाणून घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी ‘ॲग्रोवन’च्या प्रतिनिधीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, कार्यालयात जिल्हा उपनिबंधक नव्हते. सहायक जिल्हा उपनिबंधकांची दालनेही रिकामी होती. काही कर्मचारी होते, पण त्यांच्याकडून यासंदर्भात प्रतिसाद मिळाला नाही.

ट्राय करीत राहा...
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल होत नसल्याबाबतची अडचण सांगितली. या कार्यालयातून मात्र त्यावर ‘‘काही करता येणार नाही. तुम्ही आधार कार्डचा क्रमांक टाकत राहा. अर्ज भरण्यासाठी ट्राय करीत राहा, आपोआप होईल,’’ असे सांगण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. नांद्रा बुद्रुक येथे घर नाही. भावाच्या घरात राहतो. आमची पडीक जागा (प्लॉट) आहे. हा (कर्जमाफीचा) अर्ज भरला जात नाही. आणखी किती दिवस चकरा मारायच्या. समस्या सुटलीच नाही तर बारडोली येथे जावे लागेल, असे यशवंत पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com