दहावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

जळगाव - दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने नांद्रा (ता. जळगाव) येथील चेतन रमेश पाटील (वय 16) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रांमधून अचानक गायब झाल्याने त्याच्या शोधार्थ घरी पोचलेल्या मित्रांना तो छताला लटकलेला दिसला. शेजाऱ्यांना सांगून त्यांनी चेतनला खाली उतरविले. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. चेतन नांद्रा येथील श्री दत्त हायस्कूलमधील विद्यार्थी होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहावीचा निकाल त्याने व मित्रांनी मोबाईलवर ऑनलाइन पाहिला. मात्र, चेतन अनुत्तीर्ण झाल्याचे मोबाईलवर दिसले. निकाल पाहिल्यानंतर चेतन थेट घरी गेला. वडील जळगावात कामानिमित्त, तर आई लहान भावाला घेण्यासाठी धुळे येथे गेली होती. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. घरात साडीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला.
टॅग्स