‘घुबड’मुळे शहरातील पाणीपुरवठा झाला खंडित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

‘वाघूर’जवळील प्रकार; तब्बल सहा तासांनंतर सुरळीत 
जळगाव - जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये घुबड अडकल्याने वीजपुरवठा बंद झाला. परिणामी जळगाव शहराचा पाणीपुरवठाही खंडित झाला होता. तब्बल सहा तासांनंतर हा पुरवठा सुरळीत करण्यात आला.

वाघूर धरणातून जळगाव शहरास पाणीपुरवठा करण्यात येतो. याच ठिकाणी ३२ केव्हीचे वीजकेंद्र असून त्यातून पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यात येतो. वाघूर धरणानजिक असलेल्या परेश फर्मजवळ वीजवाहिनीत घुबड अडकल्याने मंगळवारी (२५ जुलै) रात्री अकराला वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जळगाव शहराला पाणीपुरवठ्यातही व्यत्यय येत आहे. शहरास आज सकाळी होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तब्बल सहा तासांनंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घुबड काढल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. सकाळी होणारा पाणीपुरवठा काही भागात दुपारी साडेबाराला झाला, तर काही भागांत दुपारी चारला करण्यात आला.

महापालिका पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी सांगितले, की आता पाणीपुरवठा सुरळीत झाला असून उद्या (२७ जुलै) शहरात होणारा पाणीपुरवठा वेळेवर होईल.