पाणीपट्टीचा घोळ मक्तेदाराचा; भुर्दंड जनतेला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

‘मनपा’चा भोंगळ कारभार; पैसे भरले असताना दाखविली दोन वर्षांची थकबाकी 

जळगाव - पाणीपट्टी अदा करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या मक्तेदाराने काम मध्येच सोडले. त्यामुळे त्याचे काम अपूर्ण राहिल्याने महापालिकेने नागरिकांना नुकत्याच अदा केलेल्या घरपट्टीत चक्क दोन वर्षांची पाणीपट्टी थकबाकी दाखविली आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या काळात अनेकांनी आगाऊ घरपट्टी भरली असतानाही त्यांच्या नावावर थकबाकी दाखविली गेल्याने नागरिक संभ्रमात आहेत. यानिमित्ताने महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी नमुना पुढे आला आहे.

‘मनपा’चा भोंगळ कारभार; पैसे भरले असताना दाखविली दोन वर्षांची थकबाकी 

जळगाव - पाणीपट्टी अदा करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या मक्तेदाराने काम मध्येच सोडले. त्यामुळे त्याचे काम अपूर्ण राहिल्याने महापालिकेने नागरिकांना नुकत्याच अदा केलेल्या घरपट्टीत चक्क दोन वर्षांची पाणीपट्टी थकबाकी दाखविली आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या काळात अनेकांनी आगाऊ घरपट्टी भरली असतानाही त्यांच्या नावावर थकबाकी दाखविली गेल्याने नागरिक संभ्रमात आहेत. यानिमित्ताने महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी नमुना पुढे आला आहे.

रस्ते दुरुस्ती, सफाई मक्‍त्याच्या घोळामुळे जनता त्रस्त असतानाच आता महापालिकेतर्फे घरपट्टी आणि पाणीपट्टी अदा करण्यातही मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने यावेळी नागरिकांना संगणकीय बिले अदा केली आहेत. गेल्या वर्षी महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वेगवेगळी दिली होती. यंदा मात्र दोन्ही बिले एकत्रच करून दिली आहेत. निवासी वापरासाठी १२ मि. मी. व्यासाच्या नळासाठी दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते. यात चक्क दोन वर्षांची चार हजार रुपये पाणीपट्टी थकबाकी दाखविली असून, यंदाचीही दोन हजार रुपये त्यात दर्शवून एकूण सहा हजार रुपये पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. परंतु घरपट्टीची रक्कम मात्र भरलेली दाखविण्यात आली आहे. 

नागरिकांची तक्रार
महापालिकेच्या या कारभाराबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेचे पाणीपट्टी भरलेली असताना थकबाकी दाखविली आहे. विशेष म्हणजे पाणी व घरपट्टी एकत्र भरलेली आहे. मग नेमकी पाणीपट्टीची थकबाकी कशी दाखविण्यात आली? असा प्रश्‍नही नागरिकांकडून केला जात आहे. नोटांबदीच्या काळात अनेक नागरिकांनी आगाऊ घरपट्टी व पाणीपट्टी भरली आहे, असे असताना त्यांनाही पाणीपट्टीची थकीत रक्कम बिलात देण्यात आली आहे. 

तक्रारीकडे दुर्लक्ष
घरपट्टीची बिले प्राप्त झाल्यानंतर अनेक नागरिक थकबाकीची तक्रार करण्यासाठी महापालिकेत जात आहेत. मात्र, त्यांची तक्रार घेण्यात येत नाही. या ठिकाणचे अधिकारीही तक्रार ऐकून घेत नाहीत. अनेक नागरिक मागील बिल भरलेल्या पावत्या सोबत घेऊन येत असतानाही अधिकारी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांत अधिक संताप व्यक्त होत आहे.

मक्तेदाराच्या घोळाचा फटका
पाणीपट्टी अदा केलेली असतानाही घरपट्टीबिलात दाखविण्यात आलेल्या दोन वर्षांच्या थकबाकीबाबत माहिती घेतली असता हा मक्तेदारांचा घोळ असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या वर्षी स्वतंत्र पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपूर येथील एका कंपनीला बिले तयार करण्याचा मक्ता देण्यात आला. मात्र, त्या कंपनीने आपले काम पूर्ण न करताच पळ काढला. संबंधित कंपनीने नागरिकांनी भरलेल्या रकमांच्या नोंदीच केल्या नाहीत. त्यामुळे हे संगणकीय काम अपूर्णच राहिले. यंदा घरपट्टी विभागाने बिले तयार करण्याचा मक्ता अमरावतील येथील स्थापत्य एजन्सीला दिला. यात घराचे मोजमाप करण्यासह संगणकीय बिले देण्याचाही मक्ता आहे. त्यानुसार या कंपनीने घरपट्टीची बिले तयार केली, मात्र पाणीपट्टीची बिले करणारी कंपनी पळून गेल्याने ऐनवेळी घरपट्टीबिलात पाणीबिले देण्याचा निर्णय घेण्यात आला. ते कामही स्थापत्य एजन्सीलाच देण्यात आले. त्यामुळे सोडून गेलेल्या कंपनीच्या ठेवलेल्या या अर्धवट नोंदींमुळे पाणीपट्टीची दोन वर्षांची थकबाकी दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

दुरुस्तीसाठी स्वतंत्र विभाग ठेवा
शहरातील बहुतांश भागांतील नागरिकांना पाणीपट्टीची चुकीची थकबाकी बिलात दाखविण्यात आली आहे. महापालिकेत आल्यानंतर नागरिकांना प्रभाग समिती कार्यालयात जाण्याचे सांगण्यात येत आहे, तर प्रभाग समिती कार्यालयात जुने रेकॉर्ड नसल्याने पुन्हा त्यांना महापालिकेत पाठविण्यात येत आहे. तसेच काही अधिकारी तर लक्षच देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणीबिलाच्या थकबाकीची दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकारी व काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.