विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणार

मतमोजणीनंतर एकमेकांना गुलाल लावून आनंदोत्सव साजरा करताना रायसोनी महाविद्यालयातील उमेदवार.
मतमोजणीनंतर एकमेकांना गुलाल लावून आनंदोत्सव साजरा करताना रायसोनी महाविद्यालयातील उमेदवार.

विजयी उमेदवारांचा निर्धार; निकालानंतर व्यक्त केल्या भावना; तरुणाईने साजरा केला आनंदोत्सव

जळगाव - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’ची ही निवडणूक वेगळा अनुभव होता. लोकशाही पद्धतीत निवडणुकीला किती महत्त्व असते, हे या अनुभवातून कळाले. ‘यिन’ व्यासपीठ आमच्यासोबत आहेच, आता त्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा निश्‍चितच उपयोग करू. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणारा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा भावना विजयी उमेदवारांनी यावेळी व्यक्त केल्या. 

युवतींचे प्रश्‍न सोडवू
सायली जाधव (बेंडाळे महिला महाविद्यालय) - ‘यिन’ व्यासपीठाच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अध्यक्षपद मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. गेल्या वर्षी निवडून आल्याने मुलींनीच उभे राहण्यास सांगितले आणि निवडून येण्याचा मनात एक विश्‍वास होता. महाविद्यालयातील युवतींचे प्रश्‍न सोडवून त्यांचा विश्‍वास जपणार. 

एकत्रित काम करण्यावर भर
विशाल वाणी (रायसोनी इन्स्टिट्यूट) - रायसोनी महाविद्यालयात ‘यिन’चा प्रतिनिधी म्हणून जी निवड झाली त्याबद्दल निश्‍चित आनंद आहे. युवा म्हणजे वायू, आकाश, अग्नी आणि वीज या उपमा देता येतील. त्यांच्यासाठीचे हे व्यासपीठ निश्‍चितच चांगले आहे. याच व्यासपीठातंर्गत जळगावच नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारतासाठी काही करण्यासाठी सर्व एकत्रितपणे काम करून विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढेच राहणार. 

पाठपुरावा करून प्रश्‍न सोडवू
सागर जाधव (मू. जे. महाविद्यालय) - ‘यिन’मुळे महाविद्यालयातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन मुलांचे कोणतेही प्रश्‍न असतील, ते अध्यक्ष म्हणून सोडविण्यासाठी कायम उभा असेल. ते प्रश्‍न वरच्यास्तरावर नेऊन त्यांचा पाठपुरावा करत राहणार. शिवाय, मुलांसाठी महाविद्यालयात मार्गदर्शनपर जितके जास्त उपक्रम घेता येतील ते निश्‍चित घेण्याचा मानस आहे. 

विद्यापीठस्तरावर प्रश्‍न मांडू
ऋषिकेश सैंदाणे (देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय) - एक विद्यार्थी असल्याने महाविद्यालय किंवा अन्य ठिकाणी वावरताना विद्यार्थ्यांना काय समस्या येतात याची जाणीव आहे. या समस्या महाविद्यालय, विद्यापीठस्तरावर मांडण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे. याकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे आम्ही दोन्ही मिळून याबाबत निर्णय घेणार आणि चांगल्यात चांगले करण्याचा प्रयत्न असेल. 

विज्ञानवादी दृष्टिकोन वाढविणार
हेमंत पोतदार (उल्हास पाटील कृषी महाविद्यालय) - विद्यार्थ्यांसाठी शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या विद्यार्थ्यांपर्यंत कशा आणता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच विद्यापीठाने काही जाचक अटी ठरवून दिल्या आहेत. त्या रद्द करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार. त्याचप्रमाणे महाविद्यालयात विविध उपक्रमांद्वारे विज्ञानवादी दृष्टिकोन वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे. 

वेगळेपण जपण्याचा प्रयत्न
पियुष पाटील (नूतन मराठा महाविद्यालय) - ‘यिन’च्या माध्यमातून महाविद्यालयात गेल्या वर्षभरात अध्यक्ष म्हणून काम करताना युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. याच्या बळावर यावर्षी देखील निवडणुकीला उभा राहिलो आणि विद्यार्थ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्‍वास दाखवून निवडून दिले. यामुळे आता जबाबदारी वाढली असून, या वर्षात आणखी काही वेगळे उपक्रम राबविणार आणि विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी लढणार
विजय पाटील (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) - ‘यिन’चा अध्यक्ष म्हणून महाविद्यालयात काम करत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक प्रश्‍नासाठी चोवीस तास तयार आहे. विद्यापीठातील सोशल सायन्स विभागात सुविधा मिळवून देण्यासाठी ‘यिन’च्या माध्यमातून कुलगुरूंना निवेदन देणार आहोत. तसेच विद्यापीठात शिष्यवृत्तीसंदर्भात कुलगुरूंची भेट घेणार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘यिन’च्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यासाठी कायम तयार राहणार.

नेतृत्वगुणांसाठी प्रभावी व्यासपीठ
प्रा. जयेंद्र लेकुरवाळे (मतमोजणी अधिकारी) - ‘सकाळ’ने महाविद्यालयीन युवकांसाठी ‘यिन’च्या माध्यमातून एक चांगले नेतृत्वगुण निर्माण करण्याचे व्यासपीठ उभे करून दिले आहे. यामधून निवडणूक प्रक्रिया राबवून एक सक्षम लोकशाही घडविण्याचे काम केले जात आहे. यामुळे आतापासून स्वच्छ मुले यात येतील आणि भविष्यातील राजकारणदेखील स्वच्छ असेल.

विधायक उपक्रमांवर भर देणार
शुभम बेंडाळे (एसएसबीटी बांभोरी महाविद्यालय) - ‘यिन’मधून महाविद्यालयात अध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व करताना वेगवेगळे आणि चांगले उपक्रम घेण्यावर अधिक भर असेल. शिवाय, काही प्रश्‍न असल्यास ते जर राज्यस्तरापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली तरी मागे न हटता ‘यिन’च्या माध्यमातून ते मांडणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com