जळगावमधील तरुणाचा हरिपुरा धरणात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

यावल - तालुक्‍यातील हरिपुरा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाजवळील धरणात जळगाव येथील एकवीसवर्षीय तरुण पोहताना बुडाला. तरुणाचे नाव वसीयोद्दीन शहाबुद्दीन कुरेशी (वय २१ वर्षे, रा. कासमवाडी, जळगाव) आहे. ही घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत धरणात शोधकार्य सुरू होते. मात्र, परिसरात पाऊस झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

हरिपुरा हे सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी गाव आहे. गावाजवळ हसन बाबा यांचा दर्गा आहे. त्यावर रमजान ईदनिमित्त आज जळगाव येथील सहा तरुण रिक्षाव्दारे बाबांच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी हरिपुरा धरण असल्याने या तरुणांपैकी काही जण धरणात दुपारी साडेचारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले. यापैकी वसीयोद्दीन कुरेशी धरणात पोहत असताना बुडाला व पाण्यात बेपत्ता झाला. त्यामुळे सोबतच्या इतर तरुणांनी शोध घेतल्यावरही तो मिळून आला नाही. परिणामी, शेजारील गावातील नागरिकांना याबाबत माहिती दिली व पोलिसांना कळविल्यानंतर बुडालेल्या वसीयोद्दीनचा शोध घेण्यात आला. मात्र, रात्र झाल्याने व या भागात पाऊस झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती.

यापूर्वी हरिपुरा धरणात सहा वर्षांपूर्वी माहेराळे येथील चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धरण हरिपुरा गावापासून चार, तर यावलपासून पंधरा ते वीस किलोमीटरवर आहे. त्यामुळे धरणात झालेल्या या घटनेची माहिती यावल येथे उशिरा कळाली. मात्र, त्यापूर्वीच तरुणांनी जळ्गाव येथे कळविल्याने जळगावहून सर्वत्र माहिती मिळू लागली.