‘जलयुक्त’साठी गणपती बाप्पा पावला!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

धुळे - जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानासाठी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये देण्यात आले असून लोकसहभागातूनही जिल्ह्यात होणारी कामे कौतुकास्पद आहेत, असे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. 

धुळे - जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानासाठी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये देण्यात आले असून लोकसहभागातूनही जिल्ह्यात होणारी कामे कौतुकास्पद आहेत, असे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. 

जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक झाली. तीत सिद्धिविनायक ट्रस्टचा एक कोटी रुपयांचा धनादेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, प्रांताधिकारी नितीन गावंडे व्यासपीठावर होते. 

लोकसहभागावर मदार
जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले की, लोकांचा सहभाग मिळत नाही तोपर्यंत कुठलेही काम यशस्वी होत नाही. जलयुक्‍त शिवार अभियान दुष्काळावर मात करण्याचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्र्यांचे या अभियानाकडे वैयक्‍तिक लक्ष आहे. जिल्हा लहान असल्याने बजेटमधून मिळणारे पैसे कमी पडतात. त्यामुळे लोकसहभागातून काम झाले, तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल. डॉ. गुंडे म्हणाले की, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते मात्र जलाशये तेवढीच राहतात. त्यामुळे आपल्या गावचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकांनी जागरूक व्हावे. पाण्याच्या प्रश्‍नासाठी आडून न राहता त्यावर उपाय शोधावा. रोहयो अंतर्गत फळबाग लागवड, सिंचन विहिरी, पाणी आडवा पाणी जिरवा खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह महत्त्वाचा आहे. 

कृषी विभागातर्फे एक लाख 
जलयुक्‍त शिवार अभियानासाठी कृषी विभागातर्फे एक लाख रुपये दिले जातील, असे कृषी अधीक्षक सांगळे यांनी सांगितले. पूर्वी पेरणी आणि पिकांचे नियोजन करताना चर्चा व्हायची. आज परिस्थिती बदलली आहे. कृषी क्षेत्र आणि शेतकरी अडचणी आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणे अपेक्षित आहे. ठिबक सिंचन उत्पादकांनी अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. सांगळे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे यांनी ग्रामपंचायतीचा कुठला निधी ‘जलयुक्‍त’च्या कामांसाठी कसा वापरता येईल, याविषयी माहिती दिली. उपजिल्हाधिकारी भारदे यांनी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत झालेली कामे, यशोगाथा व मिळालेल्या लोकसहभागाविषयी चित्रफितीद्वारे माहिती दिली. देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन, रोटरी क्‍लब, संजीवनी फाउंडेशन, ‘सकाळ- तनिष्कां’नी केलेली कामे याविषयीही त्यांनी माहिती दिली. रामकृष्ण खलाणे, मुकुंद कोळवले, विजय चांडक, कमर शेख, संजय शर्मा, उत्तमराव पाटील, रावसाहेब गिरासे, उत्तम निंबा देशमुख, पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या लीला सूर्यवंशी, रत्ना पाटील, भूषण पाटील, अजय राजपूत, विजय भामरे, संजय मोरे आदींनी मनोगत व्यक्त करीत आवश्‍यक ती यंत्रसामग्री व निधीबाबत सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. विविध विभागांचे प्रमुख, रोटरी क्‍लब, देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशनचे पदाधिकारी, तनिष्का सदस्या, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

‘तनिष्का’ करणार श्रमदान 
जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत होणाऱ्या कामांना ‘सकाळ- तनिष्का’ व्यासपीठाच्या सदस्या आपापल्या भागातील कामांवर श्रमदान करणार आहेत. गेल्या वर्षी धामणगाव (ता. धुळे) येथेही अभियानांतर्गत तलावाचे काम तसेच प्रत्येकीने आपापल्या भागातील कामांवर श्रमदान, परिसरात वृक्षलागवड केली. यावर्षीही त्याच जोमाने अभियानात प्रत्येक तनिष्कांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रत्ना पाटील, मीनल पाटील व लीला सूर्यवंशी यांनी दिली.

एक दिवसाचे वेतन अन्‌ जेसीबी 
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनेतर्फे अभियानासाठी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचे जाहीर करण्यात आले. उत्तम देशमुख यांनी पाच दिवस जेसीबी व ट्रॅक्‍टर, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे यांनी दहा लाख रुपये, विजय चांडक यांनी रोटरी क्‍लबच्या माध्यमातून मदत, उत्तमराव पाटील, भूषण पाटील यांनीही अभियानात सहभाग नोंदविण्याचे आश्‍वासन दिले.होते. 

Web Title: Jalyukat shivar yojana